मालकी हक्काच्या जागेतील डीपी शासकीय जागेत हलविण्यासाठी NOC द्या-नितीन सोनवणे
मालकी हक्काच्या जागेतील डीपी शासकीय जागेत हलविण्यासाठी NOC द्या-नितीन सोनवणे
ऑल इंडिया पॅंथर सेनेची बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्याकडे मागणी
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील धानोरा रोडवरील अशा टॉकीज चौक परिसरातील महाराणा प्रताप चौक ते करपरा नदी मार्गावर असलेल्या जगन्नाथ भीमराव रेंगे यांच्या मालकी हक्काच्या प्लॉटमध्ये महावितरणची विद्युत डीपी (रोहित्र) बसविण्यात आलेली आहे. सदर डीपीमुळे खासगी जागेच्या वापरात अडथळा निर्माण होत असल्याने ती शासकीय जागेत स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्याकडे करण्यात आली.
या संदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी कार्यकर्त्यांसह संबंधित जागेची पाहणी केली. तसेच मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकरणातील कागदपत्रे आणि प्लॉटमालकाची बाजू प्रशासनासमोर मांडली.
या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महावितरण विभागाला डीपी स्थलांतरित करण्यासंदर्भात पत्र देण्यात आलेले असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही स्थळपाहणी केली आहे. डीपी नालीलगत असलेल्या शासकीय जागेत स्थलांतरित करण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे संबंधित कागदपत्रांवरून दिसून येत असल्याचे नितीन सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, नगरपरिषदेकडून दुसऱ्या बाजूला NOC देण्यात आल्याचा आक्षेप प्लॉटमालकाने घेतला आहे. त्यामुळे संबंधित NOC कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आली, तिची कायदेशीर वैधता काय आहे आणि ती देताना जागेच्या मालकी हक्काची पडताळणी करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संबंधित जागेची अधिकृत मोजणी करून खासगी मालकीची जागा, शासकीय जागा, नाली व रस्त्याची हद्द निश्चित करावी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व महावितरण यांच्या पत्रानुसार कार्यवाही करावी, दुसऱ्या पक्षाला दिलेल्या NOC ची वैधता तपासावी आणि नागरिकाच्या मालकी हक्काचे संरक्षण करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
प्लॉटमालक जगन्नाथ भीमराव रेंगे हे 72 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांच्या मालकी हक्काच्या जागेतील डीपी शासकीय जागेत स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने नियमानुसार सहकार्य करावे, अशी मागणी नितीन सोनवणे यांनी केली.
नागरिकांच्या कायदेशीर मालकी हक्कांशी संबंधित या प्रकरणात प्रशासनाने निष्पक्ष निर्णय घ्यावा. जगन्नाथ रेंगे यांना कायद्यानुसार न्याय मिळेपर्यंत ऑल इंडिया पॅंथर सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे नितीन सोनवणे यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment