गेवराईतील घराणेशाही मोडीत काढून वंचित बहुजन आघाडी राजकीय पर्याय उभी करणार — ॲड. डॉ. अरुण आबा जाधव
गेवराई (प्रतिनिधी):आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि गेवराई विधानसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने लढणार असून, तालुक्यातील प्रस्थापित घराणेशाही मोडीत काढून एक सक्षम राजकीय पर्याय उभा केला जाईल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा बीड जिल्हा प्रभारी ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी केले. गेवराई येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांनी तालुक्यातील प्रस्थापित नेतृत्वावर टीका केली. गेल्या अनेक वर्षांपासून गेवराईमध्ये पवार आणि पंडित घराण्याची सत्ता असून, त्यांच्याकडून शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि भूमिहीन वंचित घटकांचे शोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही घराणेशाही संपवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी, मुस्लिम अल्पसंख्याक, भटके विमुक्त, बौद्ध आणि मातंग समाजाला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी सत्तेत बदल घडवेल, असा विश्वास जामखेड नगरपरिषदेचे गटनेते असलेल्या जाधव यांनी व्यक्त केला.
तसेच, २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या 'संविधान सन्मान महासभेसाठी' गेवराई तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रमुखांची उपस्थिती:
या कार्यकर्ता संवाद बैठकीला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रा. विष्णू जाधव सर, बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष किरणभाऊ वाघमारे, पूर्व जिल्हाध्यक्ष प्रकाश उजगरे, जिल्हा महासचिव दिलीप माने, उपाध्यक्ष अनवर पाशा अहमद सय्यद, संघटक ॲड. राजेश शिंदे, बाळासाहेब गायकवाड (पाटोदा), ओबीसी नेते व जिल्हा सदस्य किशोर चौधरी, उपाध्यक्ष सुदेश पोतदार, वचिष्ठ कावळे, भीमराव चव्हाण, ओबीसी नेते बजरंग सानप, बळीभीम बारगजे आणि चंद्रकांत औसरमल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासोबतच बैठकीस प्रदीप तुरुकमारे, अजयकुमार पप्पू गायकवाड, ज्ञानेश्वर हवाले, प्रमोद निकाळजे, प्रदीप शिंदे, सुधाकर केदार, पप्पू वाव्हळ, किशोर भोले, मिलिंद तायडे, भक्तप्रल्हाद मगर, श्रीपती ससाणे, तीर्थराज सोनवणे, अशोक पवार, भीमराव वाव्हळ, गोरख ससाणे यांच्यासह ओबीसी संघर्ष समिती, भटके विमुक्त संघटना, मुस्लिम संघटना व समविचारी पक्ष-संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment