बोरफडीच्या वैष्णवीचा आवाज आता राज्यस्तरीय बालसंसदेत घुमणार

बोरफडीच्या वैष्णवीचा आवाज आता राज्यस्तरीय बालसंसदेत घुमणार!

बालस्नेही ग्रामपंचायत उपक्रमातून बोरफडीची राज्यस्तरावर भरारी; बालसरपंच वैष्णवी घुगे करणार बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

२० नोव्हेंबरला पुण्यात बालसंसद; मराठवाड्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडणार परखड भूमिका
बीड प्रतिनिधी : - गावाच्या विकासाच्या निर्णयप्रक्रियेत बालकांचाही आवाज महत्त्वाचा ठरू शकतो, याची प्रचिती बीड तालुक्यातील बोरफडी गावाने दिली आहे. बालस्नेही ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत बोरफडी ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय बालसंसदेसाठी निवड झाली असून, गावाची बालसरपंच वैष्णवी घुगे आता राज्याच्या व्यासपीठावर बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ग्रामीण भागातील एका बालसरपंचाला मिळालेली ही संधी बोरफडीसह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथील यशदा प्रशिक्षण केंद्रात राज्यस्तरीय बालसंसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संसदेत वैष्णवी मराठवाड्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे. दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शेतीचे नुकसान, शेतकरी कुटुंबांची आर्थिक ओढाताण आणि दुष्काळ निवारणासाठी शासनाने करावयाच्या उपाययोजना हे विषय ती प्रभावीपणे मांडणार आहे.

शेतकऱ्यांच्या वेदना बालसरपंचाच्या शब्दांत!

मराठवाड्यातील दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतकरी कुटुंबांना बसतो. त्याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि बालपणावरही होतो. पाणीटंचाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, रोजगाराचा प्रश्न, शेतीतील अनिश्चितता आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या या विषयांकडे वैष्णवी राज्यस्तरीय बालसंसदेचे लक्ष वेधणार आहे. त्यामुळे एका बालसरपंचाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव राज्याच्या व्यासपीठावर मांडले जाणार आहे.

बालस्नेही गावाच्या संकल्पनेला बळ

बालकांना केवळ योजनांचे लाभार्थी न मानता गावाच्या विकास प्रक्रियेतील सक्रिय भागीदार बनविणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे, लोकशाही मूल्यांची रुजवण करणे आणि स्वतःच्या प्रश्नांवर निर्भीडपणे मत मांडण्याची संधी देणे, हा बालसंसदेचा महत्त्वाचा उद्देश आहे. बोरफडी ग्रामपंचायतीची झालेली निवड ही बालस्नेही गावाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

बोरफडीच्या शिरपेचात मानाचा तुरा

ग्रामीण भागातील एका बालिकेला राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे. वैष्णवी घुगे हिच्या निवडीबद्दल युवा सरपंच कैलास घुगे यांच्यासह ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बोरफडीच्या मातीतून घडलेले हे बालनेतृत्व आता पुण्यातील राज्यस्तरीय व्यासपीठावर आपली भूमिका मांडणार आहे. वैष्णवीचा आवाज केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता मराठवाड्यातील बालकांचे, शेतकरी कुटुंबांचे आणि ग्रामीण भागातील विकासाच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 -- बाजीराव ढाकणे 
बीड जिल्हा समन्वयक,
 लेक लाडकी अभियान

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी