सहकारी संस्थांच्या स्वायत्ततेवर घाला घालणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

गोकुळ वाचवा; लोकशाही वाचवा!

सहकारी संस्थांच्या स्वायत्ततेवर घाला घालणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने :- डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. ०९) महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या स्वायत्ततेवर घाला घालून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात पश्चिम महाराष्ट्राची आर्थिक व सामाजिक जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ सहकारी संस्थेच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत शासन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सरकारच्या मनमानी, एकाधिकारशाही आणि लोकशाहीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘गोकुळ वाचवा, लोकशाही वाचवा’, ‘देवाभाऊ, रडारडीचा डाव बंद करा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत कायद्यातील पळवाटा शोधून अध्यादेशाच्या माध्यमातून नवीन शासकीय पदांची निर्मिती करून सहकारी संस्थेवर अप्रत्यक्ष नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. सहकारी संस्थांच्या कारभारात शासनाचा अनावश्यक हस्तक्षेप म्हणजे संस्थांच्या स्वायत्ततेवर गदा असून, हा शेतकरी सभासदांच्या लोकशाही अधिकारांवर घाला असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

सहकार क्षेत्र हे शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. त्यामुळे राजकीय सत्तेच्या जोरावर सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न थांबवावेत, संस्थांचे स्वतंत्र अस्तित्व आणि सभासदांचे अधिकार अबाधित ठेवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात हे होते सहभागी : माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनूस, सरफराज पठाण, शेख मुबीन, रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष), माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), पठाण रफिक ( जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक बीड), राजेंद्र आमटे (शेतकरी हक्क मोर्चा आंदोलक), भिमराव कुटे ( मराठवाडा अध्यक्ष,राष्ट्रीय किसान मोर्चा), सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोडके, विजय झोडगे,ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे,सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, प्रविण आनेराव, माऊली शिंदे, आदी सहभागी झाले होते.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी