लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची बैठक संपन्न

लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची बैठक संपन्न!

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा, औषधसाठा, स्वच्छता व आरोग्य उपक्रमांचा घेतला आढावा
लिंबागणेश : (दि.०५) महाराष्ट्रातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, आरोग्य केंद्राच्या कामकाजात लोकसहभाग वाढावा तसेच आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून जन आरोग्य समितीची स्थापना केली आहे. याच अनुषंगाने लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची बैठक संपन्न झाली.

जन आरोग्य समितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि समुदाय प्रतिनिधींचा समावेश असतो. प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणे आणि रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही समितीची प्रमुख जबाबदारी आहे. रुग्णांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळतात की नाही, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का, रुग्णालयातील स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व प्रसाधनगृहांची व्यवस्था तसेच प्रसूती झालेल्या महिला आणि नवजात बालकांना आवश्यक सुविधा मिळतात की नाही, यावर समिती देखरेख ठेवते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली चिटकुलवार होत्या. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये माता व बाल आरोग्य कार्यक्रम, लसीकरण मोहिमेचा आढावा, क्षयरोग, कुष्ठरोग, मधुमेह व रक्तदाब तपासणी कार्यक्रम, साथीच्या आजारांबाबत जनजागृती तसेच गावपातळीवरील आरोग्यविषयक समस्यांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जन आरोग्य समितीच्या नवनियुक्त सदस्यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीस वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर आंधळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी, ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड, सुखदेव वाणी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी