खा. बजरंग बप्पा सोनवणे 'दिशा' बैठकीत राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेबाबत ठोस निर्णय घेणार का?
खा. बजरंग बप्पा सोनवणे 'दिशा' बैठकीत राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेबाबत ठोस निर्णय घेणार का?
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठका केवळ कागदोपत्री; महामार्गांवरील खड्डे, भेगा आणि अपघातांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!
डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल
बीड (दि. २८) : बीड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे आणि रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांना गती देण्यासाठी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. ३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात 'दिशा' आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांवरही चर्चा होणार आहे. 'आपल्या समस्या, आमचा पाठपुरावा' या भूमिकेतून खासदारांच्या कार्यालयाने नागरिकांना आपल्या भागातील रस्त्यांसंदर्भातील तक्रारी ९४७७१६१६१६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांचे प्रश्न बैठकीत मांडून त्यावर ठोस कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी, खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी आणि पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ या मार्गांवरील कामे अनेक ठिकाणी रखडलेली असून, निकृष्ट दर्जाचे काम, रस्त्यांवरील भेगा, तडे आणि मोठमोठे खड्डे यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या महामार्गांवर वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप डॉ.गणेश ढवळे यांनी केला आहे.
या गंभीर प्रश्नांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे आगामी 'दिशा' बैठकीत खासदार बजरंग सोनवणे या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून दुरुस्तीची कालमर्यादा निश्चित करणार का, असा सवाल डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या 'वांझोट्या' बैठका; ठोस उपाययोजना कधी?
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे होणाऱ्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठका केवळ कागदोपत्री सोपस्कार ठरत असल्याचा आरोप डॉ.गणेश ढवळे यांनी केला आहे. रस्ते वाहतूक सुरक्षा, अपघात कमी करणे, अपघातप्रवण क्षेत्रांची तपासणी, वेगमर्यादा आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्यामुळे होणारे अपघात अशा विषयांवर चर्चा केली जाते. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न गांभीर्याने मांडला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डे, भेगा आणि निकृष्ट कामांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोणाची? रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत प्रत्यक्ष रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत निर्णय होत नसतील, तर अशा बैठकांचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत आगामी 'दिशा' बैठकीत राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment