टँकर अपघाताचा बनाव रचून कॉटन वॉश ऑईलची फसवणूक; बीड पोलिसांकडून २९.९५ लाखांचे तेल जप्त
टँकर अपघाताचा बनाव रचून कॉटन वॉश ऑईलची फसवणूक; बीड पोलिसांकडून २९.९५ लाखांचे तेल जप्त
बीड: तेलाचा टँकर पलटी झाल्याचा बनाव रचून कॉटन वॉश ऑईलची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी सुमारे ३० लाख रुपये किमतीचे तेल हस्तगत केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील 'माऊली ॲग्रो फूड ॲण्ड ऑईल इंडस्ट्रीज'मधून ३५ हजार ३० किलो कॉटन वॉश ऑईल (किंमत ५१,९०,००० रुपये) भरून गुजरात येथील 'अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज, चांगोदर' येथे पाठवण्यात आले होते. मात्र, टँकर चालक जसवंत सिंग गुरुचरन सिंग (रा. मोहोल्ला नाना कसार, रोही कांडा, जि. तरन तारन, पंजाब) याने तेल तिथे न पोहोचवता धुळे-सुरत रोडवरील विरपूर (ता. व्यारा) गावाजवळ रिकामा टँकर पलटी करून अपघाताचा बनाव रचला व तो पळून गेला. याप्रकरणी फिर्यादी अभिषेक जगदीश चरखा (रा. वेंकटेश नगर, पेठ बीड) यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक शहा यांनी घटनास्थळी पाहणी व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर अपघाताचा बनाव असल्याचे स्पष्ट झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धुळे येथील मोहाडी उपनगर परिसरातून अनिल उत्तम तोटे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने टँकरमधील तेल विकत घेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून २० टन कॉटन वॉश ऑईल (किंमत २९,९५,६९४ रुपये) जप्त करून ते फिर्यादीच्या ताब्यात दिले आहे. तेल फसवणुकीच्या गुन्ह्यात मुद्देमाल हस्तगत करण्याची ही बीड पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पेठ बीड पोलिसांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment