हरित अभियानाचा पुरस्कार स्वीकारणारे जिल्हा प्रशासन शासकीय कार्यालयांतील वृक्षतोडीवर गप्प का?
हरित अभियानाचा पुरस्कार स्वीकारणारे जिल्हा प्रशासन शासकीय कार्यालयांतील वृक्षतोडीवर गप्प का?
विनापरवानगी वृक्षतोडीप्रकरणी जिल्हा प्रशासनाची धृतराष्ट्राची भूमिका; वनविभाग केवळ हप्तेवसुलीसाठीच आहे का? – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.२४) : हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर बीड जिल्हा प्रशासनाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी एकाच दिवसात ३० लाख वृक्षलागवडीचा विक्रम नोंदविला. या विक्रमाची ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला. मात्र, दुसरीकडे बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कारागृह, पाटबंधारे विभाग आणि जिल्हा रुग्णालय परिसरात कथित विनापरवानगी वृक्षतोड सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचा विक्रम आणि प्रत्यक्षात होत असलेली वृक्षतोड यातील विरोधाभास उघड झाला आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचारप्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा प्रशासन व वनविभागाकडे वेळोवेळी लेखी निवेदने देऊन तसेच आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वनविभागाचे अधिकारी केवळ ‘आम्ही वृक्षतोडीस परवानगी दिलेली नाही’ असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. मग विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची? हरित अभियानांतर्गत पुरस्कार स्वीकारणारे जिल्हा प्रशासन आणि वनविभाग शासकीय कार्यालयांतील वृक्षतोडीबाबत धृतराष्ट्राची भूमिका का घेत आहेत, असा संतप्त सवाल डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, वनमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरातील ५९ वृक्षांची कत्तल; दोषींवर कारवाई करा!
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या आतील तब्बल ५९ झाडे अर्धवट तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी याबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. संबंधित महामार्ग व इतर विभागांना पत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत कळविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तोडण्यात आलेल्या ५९ वृक्षांमध्ये २१ शिसम, ९ लिंब, ७ शेवरी, ५ निलगिरी, ५ जंगली, ३ नारळ, ३ शोभेची झाडे, २ गुलमोहर, २ पिंपळ, १ अशोक आणि १ जांभूळ या वृक्षांचा समावेश आहे. रुग्णालय परिसरातील या वृक्षतोडीची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.
शासकीय कार्यालयांतील वृक्षतोडीला प्रशासनाचे अभय?
बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग, जिल्हा कारागृह आदी शासकीय कार्यालयांतील विनापरवाना वृक्षतोडीबाबत लेखी तक्रारी व आंदोलने करूनही जिल्हा प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढले असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालय परिसरातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.
एकीकडे लाखो वृक्षलागवडीचा विक्रम आणि पुरस्कारांचा गाजावाजा करायचा, तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांतील वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करायचे, हा दुटप्पीपणा थांबविण्याची गरज असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे.
वनविभाग केवळ हप्तेवसुलीसाठीच आहे का?
बीड जिल्ह्यातील वनविभागाच्या वनीकरणासह इतर कामांमधील कथित अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी वारंवार केली आहे. मात्र, चौकशीस टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, सामाजिक वनीकरण विभागाचे तत्कालीन विभागीय वनाधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना ४५ लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक झाल्याने वनविभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनविभागाची भूमिका नेमकी वृक्षसंवर्धनासाठी आहे की केवळ हप्तेवसुलीसाठी, असा सवाल पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शासकीय कार्यालयांतील वृक्षतोडीची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून तोडलेल्या वृक्षांची संख्या, परवानग्या, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करावी. दोषींवर कठोर कारवाई करून वृक्षतोड झालेल्या ठिकाणी भरपाई स्वरूपात वृक्षलागवड करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment