दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांचे पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू करा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांचे पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू करा!

 मुख्यमंत्री पशुधन योजनेची अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.१६) : बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, जनावरांसाठी दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, तसेच दोन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या मुख्यमंत्री पशुधन योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी सोमवार, दि.१६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, मुबीन शेख, रामनाथ खोड, सादेक सय्यद ( शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), रफिक पठाण (उपाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले ( जिल्हाध्यक्ष इंटक बीड), सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोडके, भिमराव कुटे (मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा), ज्येष्ठ समाजसेवक डॉ.संजय तांदळे, प्रा.डी.जी.तांदळे ( जिल्हाध्यक्ष किसान सभा बीड), सरफराज पठाण, विजय घाडगे, तुकाराम पवार आदी सहभागी होते.

 आदी सहभागी झाले होते.

चारा आणि पाण्याअभावी पशुधन संकटात!

बीड जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान, पावसातील खंड आणि तीव्र पाणीटंचाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

शेतीसोबतच पशुधन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. बाजारातून चारा विकत घेणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांवर आपली जनावरे कवडीमोल दराने विकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

 चारा छावण्यांसाठी आठ प्रमुख मागण्या

१. दुष्काळी व चारा टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात.
२. चारा छावण्यांसाठी असलेल्या जाचक अटी व कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करावी.
३. छावण्यांमध्ये हिरवा व सुका चारा, पिण्याचे पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात.
४. ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाला छावण्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत.
५. चारा टंचाईग्रस्त गावांचे तातडीने सर्वेक्षण करावे.
६. शेतकऱ्यांना चारा खरेदी अनुदान किंवा चारा डेपोच्या माध्यमातून सवलतीच्या दरात चारा द्यावा.
७. चारा छावण्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पारदर्शक देखरेख यंत्रणा निर्माण करावी.
८. छावण्या सुरू होईपर्यंत पशुपालकांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी.

मुख्यमंत्री पशुधन योजना कागदावरच! दोन वर्षांपासून अंमलबजावणीची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पशुधन योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व वराहपालनासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र, अद्याप या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. लाभार्थ्यांना अर्ज करता यावा यासाठी आवश्यक असलेले पोर्टलही सुरू झालेले नाही. पोर्टल सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिने लागतील, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पशुधन योजनेचे पोर्टल तातडीने सुरू करून पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 पशुधन वाचविणे ही शासनाचीही जबाबदारी!

शेतकऱ्यांच्या हातातील शेती पुन्हा उभी करता येऊ शकते; मात्र पशुधन एकदा नष्ट झाले तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पशुधन वाचविणे ही केवळ शेतकऱ्यांची नव्हे, तर शासनाचीही जबाबदारी आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने कोणतीही दिरंगाई न करता चारा छावण्या सुरू कराव्यात आणि मुख्यमंत्री पशुधन योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. अन्यथा शेतकरी व पशुपालकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी