बाळासाहेबांचा शिवसैनिक ही ओळख माझ्यासाठी आयुष्यभर जपलेला स्वाभिमान- अनिलदादा जगताप



बाळासाहेबांचा शिवसैनिक ही ओळख माझ्यासाठी आयुष्यभर जपलेला स्वाभिमान- अनिलदादा जगताप

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन


बीड, प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मिळालेली ओळख ही माझ्यासाठी केवळ राजकीय ओळख नसून आयुष्यभर जपलेला स्वाभिमान आहे. बाळासाहेब आज देहाने आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांतून, हिंदुत्वाच्या भूमिकेतून आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात ते आजही जिवंत आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणे, हेच त्यांना वाहिलेले खरे अभिवादन आहे, अशी भावना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी व्यक्त केली.

   काल दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनिलदादा जगताप यांनी सहकारी पदाधिकारी व शिवसैनिकांसमवेत बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अनिलदादा जगताप म्हणाले की, शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळजाला चटका लावणारा आणि वेदनादायी आहे. याच दिवशी बाळासाहेबांनी देहाने आपल्यातून निरोप घेतला. मात्र, आजवर मी त्यांना कधीही स्वर्गवासी म्हटले नाही. कारण बाळासाहेब माझ्यासाठी आजही जिवंत आहेत. माझ्या हृदयात, विचारांत आणि प्रत्येक श्वासात ते आहेत. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, परिस्थितीही बदलली; मात्र बाळासाहेबांविषयीचे प्रेम, निष्ठा आणि त्यांच्या विचारांवरील श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे, हीच आमच्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाची खरी बांधिलकी आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, यापेक्षा अभिमानाची दुसरी कोणतीही ओळख माझ्यासाठी असू शकत नाही. ही केवळ ओळख नसून आयुष्यभर जपलेला स्वाभिमान आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्वाचा आणि जनसेवेचा वारसा आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत, ही प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकासाठी समाधानाची बाब आहे. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी धावून जाण्याची वृत्ती आणि कार्यकर्त्याला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका यातून बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालत असल्याची भावना अधिक दृढ होते. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे, त्यांच्या नेतृत्वाला साथ देणे आणि बाळासाहेबांनी दिलेला विचारांचा वारसा कृतीतून जपणे, हेच माझ्यासाठी बाळासाहेबांना वाहिलेले खरे अभिवादन आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

   याप्रसंगी प्रास्ताविक प्रतिक कांबळे यांनी केले. तर जिल्हा संघटक सुनील सुरवसे, तालुकाप्रमुख संतोष जाधव, शेतकरीसेना जिल्हाप्रमुख अॅड. बापूसाहेब जाधव, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय कवचट, विधीसेना जिल्हाप्रमुख अॅड. संतोष घोलप, महिला आघाडी संपर्कप्रमुख अॅड. संगीता चव्हाण आणि महिला आघाडी जिल्हा समन्वयक प्रतिभा गणोरकर यांनी मनोगत व्यक्त करून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला व त्यांना अभिवादन केले. यावेळी बीड विधानसभा प्रमुख सुनील भाऊ अनभुले, बीड नगरपालिकेचे सभापती अॅड. संजय उडान, उपजिल्हाप्रमुख अमोल जाधव, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक काळे, तालुका समन्वयक आबासाहेब आगलावे, शहर समन्वयक हनुमानप्रसाद पांडे, जिल्हा सहसंघटक सुनील गवते, शहर सहसंघटक ऋषिकेश जोगदंड, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनोरमा डोईफोडे, महिला आघाडी विधानसभा प्रमुख प्रणिता पवार, तालुकाप्रमुख सुनीता जाधव, तालुकाप्रमुख जया राऊत, शहरप्रमुख मनीषा मोराळे यांच्यासह अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी