शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा व पाणी छावण्या तात्काळ सुरू करा
शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा व पाणी छावण्या तात्काळ सुरू करा!
प्रकाश भैय्या सोनसळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
बीड प्रतिनिधी :
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, याचा मोठा फटका शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांना बसत आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने मेंढपाळ बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मेंढपाळ समाजातील बांधव आपल्या शेळ्या-मेंढ्यांना घेऊन रानावनात भटकंती करत असतात. अनेक मेंढपाळांकडे १०० ते २०० शेळ्या-मेंढ्या असून, सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत कठीण झाले आहे. चारा आणि पाण्याअभावी पशुधनाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आज बीड शहरालगत धनगर समाज संघटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांनी मेंढपाळ बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मेंढपाळ बांधवांनी आपली व्यथा मांडताना शासनाने तातडीने शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
मेंढपाळ बांधवांच्या या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील मेंढपाळ समाजाच्या न्याय्य मागणीची दखल घेऊन शेळ्या-मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
मेंढपाळांचे पशुधन हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, हीच महाराष्ट्रातील तमाम मेंढपाळ बांधवांची मागणी आहे.यावेळी मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment