विकास योजनांचा लाभ आदिवासींना घरपोच द्यावा पालकमंत्री संजय शिरसाट

विकास योजनांचा लाभ आदिवासींना घरपोच द्यावा पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर: (प्रतिनिधी) दि.१५ नोव्हेंबर -              
शासनामार्फत आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र दुर्गम भागात वास्तव्य आणि कमी जागृती असलेल्या आदिवासी समाजापर्यंत योजनांचा लाभ मिळत नाही म्हणून आता आदिवासी विकास विभागाने घरपोच लाभ द्यावा,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आजच्या कार्यक्रमात मत व्यक्त केले.
         क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम जनजातीय गौरव दिन समारंभाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास येथील अंबिका लॉन्स येथे करण्यात आले होते. 
         या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संजय शिरसाट, विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाट, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, आदिवासी विकास विभागाच्या अमरावती विभागीय प्रादेशिक उपायुक्त शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाणेश्वर भगत, डॉ. उद्धव वायाळ, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन सोनवणे, दीपक पवार, कलावंत विद्यार्थिनी भारती गांगुर्डे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते आदिवासी नायकांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.
        पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आदिवासी समाज हा तुलनेने कमी शिक्षित आहे. तो दुर्गम भागात राहतो. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी शासनाने केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने आता स्वतःहून आदिवासींच्या घरापर्यंत जाऊन योजनांचा लाभ दिला पाहिजे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे साहस आणि धैर्य याचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. तसेच भूमिहीन कास्तकारांच्या ताब्यात शासनाच्या गायरान आणि वन जमिनी मागील पन्नास वर्षापेक्षा जास्त ताब्यात असूनही त्यांना जमिनीचे सातबारा आणि मालकी मिळाली नाही ही खंत माझ्या मनात आहे. या जमिनीच्या प्रश्नाच्या संदर्भाने विधानसभेमध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि गायरान धारक, वन जमीन कास्तकारांना त्यांचा हक्काचा सातबारा मिळवून देणार आहोत. आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आदिवासी समाजाचा मुंबई येथे येत्या फेब्रुवारी महिन्यात मेळावा घेण्यात येईल. आदिवासी समाजातील मुला-मुलींनी शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन प्रगती साधावी. सर्वच क्षेत्र त्यांच्यासाठी खुले आहेत,असेही त्यांनी सांगितले.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासींच्या संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांचे रुप साकारलेल्या नवसुख कोळसे या बालकाचे व कलावंत विद्यार्थिनी भारती गांगुर्डे यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी, आदिवासी समाजातील महिला-पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
      या सप्ताहात दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शिरुर कासार येथे आधार कार्ड व इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांचे सेवा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा, आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी जालना, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि महसूल कर्मचारी उपस्थित राहतील.
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे जनजागृती सप्ताहाचा अधिकृत समारोप होईल अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने देण्यात प्रकल्प अधिकारी यांनी आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी