महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील निराधारांसोबत दिवाळी फराळ अन् स्नेहभोजनाचा भावस्पर्शी उपक्रम
दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा दीप उजळला
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील निराधारांसोबत दिवाळी फराळ अन् स्नेहभोजनाचा भावस्पर्शी उपक्रम
बीड | प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि नात्यांचा सण. मात्र, ज्यांच्या आयुष्यात रक्ताच्या नात्यांनीच अंधार निर्माण केला, ज्यांना आपल्याच माणसांनी घराबाहेर काढले, अशा निराधारांच्या आयुष्यातही प्रेमाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा प्रकाश निर्माण व्हावा, या संवेदनशील भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात दिवाळी फराळ आणि गोड स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीसोबतच माणुसकीचे नाते जपणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी अत्यंत भावस्पर्शी ठरला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक तथा प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येत या उपक्रमाचे आयोजन केले.
दिवाळीच्या सणात प्रत्येक घर प्रकाशाने उजळलेले असते. कुटुंबातील सदस्य एकत्र येतात, आनंदाचे क्षण साजरे करतात. मात्र जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील अनेकांच्या आयुष्यात अशी कौटुंबिक ऊब हरवलेली आहे. ज्यांना आपल्याच रक्ताच्या नात्यांनी दूर केले, ज्यांच्या वाट्याला एकाकीपणा, वेदना आणि उपेक्षा आली, अशा व्यक्तींसाठी जिव्हाळा बेघर निवारा केंद्र हे आशेचा किरण ठरले आहे. या केंद्रातील दुःखितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आणि त्यांच्या मनातील एकाकीपणा काही क्षणांसाठी तरी दूर करण्यासाठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी थेट त्यांच्यामध्ये सहभागी होत दिवाळी साजरी केली.
यावेळी सर्व बेघर लाभार्थ्यांना दिवाळीचा फराळ प्रेमाने वाटप करण्यात आला. त्यानंतर सर्वांसाठी गोड जेवणाचे आयोजन करण्यात आले. केवळ फराळाचे पदार्थ किंवा गोड जेवण देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नव्हता, तर ज्यांच्या आयुष्यात मायेची माणसे दुरावली आहेत, त्यांना आपलेपणाचा अनुभव देणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्यासोबत आनंदाचे काही क्षण घालवणे, ही या उपक्रमामागील खरी भावना होती.
पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी बेघर लाभार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, डोळ्यांतील आनंद आणि मिळालेल्या आपुलकीची भावना या उपक्रमाचे खरे फलित होते. समाजातील वंचित, उपेक्षित आणि निराधार घटकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे, हीच दिवाळीच्या सणाची खरी सार्थकता असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील दुःख, वेदना आणि उपेक्षितांच्या प्रश्नांशी नाते जोडणारी असली पाहिजे. पत्रकारांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी व्हावे, याचे सुंदर उदाहरण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या उपक्रमातून पाहायला मिळाले.
प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या माणुसकीच्या उपक्रमाचे बीड जिल्ह्यातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि बीड जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या पणत्या घराघरांत उजळतात पण दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण उजळविणारी माणसेच खऱ्या अर्थाने माणुसकीचा दीप प्रज्वलित करतात. जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील दिवाळीचा हा सोहळा त्याच माणुसकीचा सुगंध दरवळवणारा ठरला.!
Comments
Post a Comment