शिवाजीनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे घरून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी १४ तासांत सुखरूप मिळाली
बीड (दि. १४):वडिलांच्या रागवण्याच्या कारणावरून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या १४ तासांत शोध घेऊन तिला सुखरूप तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी ही मुलगी घरातून निघून गेल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. शहरातील विविध भागांतील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले व विविध ठिकाणी शोध घेण्यात आला. अखेर रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास छत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका झोपडीजवळ सदर मुलगी सुखरूप आढळून आली.
पोलिसांच्या तत्परतेने व नियोजनबद्ध शोधमोहिमेमुळे मुलगी सुखरूप मिळाल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश पंडित, पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे, पोलीस अमलदार सूरज वाघमारे व आफ़ताब शेख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Comments
Post a Comment