बीड कारागृहातून गुन्हेगारी कारवायांचे सूत्र हलवले जात असल्याचा आरोप; बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाला धमक्या
बीड कारागृहातून गुन्हेगारी कारवायांचे सूत्र हलवले जात असल्याचा आरोप; बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाला धमक्या!
खटला मागे घेण्यासाठी पैशांचे आमिष आणि जीवे मारण्याची धमकी; पोलीस कर्मचारी रमेश खाडे यांच्यावर गंभीर आरोप
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची पीडित कुटुंबाने घेतली भेट; कारवाईसह २४ तास सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
बीड (प्रतिनिधी) : धारूर तालुक्यातील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कारागृहात असतानाही त्याच्याकडून पीडित कुटुंबावर खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पैसे देण्याचे आमिष दाखवून खटला मागे घेण्यास सांगितले जात असून, तसे न केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी रमेश खाडे यांचा सहभाग असल्याचा आरोपही कुटुंबाने केला आहे.
या संदर्भात पीडित कुटुंबाने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार मांडली. संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि कुटुंबाला २४ तास सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोन व्हॉट्सॲप कॉलद्वारे धमक्या दिल्याचा आरोप
पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 0419/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ३५१(२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अजिनाथ नरहारी नागरगोजे सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.
दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०७ वाजता रमेश खाडे यांनी पीडितेच्या पतीला व्हॉट्सॲप कॉल करून, आरोपीच्या सांगण्यावरून खटला मागे घेण्याबाबत पैशांचे आमिष दाखवले आणि नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०५ वाजता पुन्हा त्याच क्रमांकावरून फोन करून आरोपी बाहेर आल्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित संभाषणाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; कारवाईचे आश्वासन
या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. पोलीस कर्मचारी रमेश खाडे यांची कथित भूमिका, धमकीचे फोन आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबतची चिंता याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी प्रकरणात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पीडित कुटुंबाने सांगितले.
पीडित कुटुंबाच्या प्रमुख मागण्या
१. धमकी देण्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा.
२. पोलीस कर्मचारी रमेश खाडे यांच्या भूमिकेची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास निलंबनासह कठोर कारवाई करावी.
३. धमकीच्या व्हॉट्सॲप कॉलसंदर्भातील उपलब्ध पुरावे जप्त करून सायबर तपास करावा. तसेच कारागृहातील मोबाईल वापर आणि संबंधित संपर्कांची नियमानुसार चौकशी करावी.
४. मुख्य आरोपी आणि संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यातील संपर्काबाबत आवश्यक तांत्रिक तपासणी करावी.
५. पीडित महिला, तिचे कुटुंबीय आणि महत्त्वाच्या साक्षीदारांना साक्षीदार संरक्षण योजनेअंतर्गत २४ तास सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे.
कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात न्याय मिळवण्यासाठी लढणाऱ्या पीडित कुटुंबालाच धमक्या मिळत असतील, तर त्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. आरोपी कारागृहात असतानाही बाहेरून दबाव आणला जात असल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने ठोस कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. अन्यथा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित कुटुंबीय आणि महिलांसह आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय आणि सुरक्षितता मिळवून देण्याबाबत आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment