बीडमध्ये रस्ते व नाली बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; उच्चस्तरीय चौकशीची मागणी- नितीन सोनवणे

बीडमध्ये रस्ते व नाली बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; उच्चस्तरीय चौकशीची मागणी- नितीन सोनवणे

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका मार्गावरील कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्याची ऑल इंडिया पॅंथर सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बीड, दि. १९ (प्रतिनिधी) : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या मार्गावरील रस्ते, नाली व पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, बीड यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर कामातील तांत्रिक निकषांचे पालन, बांधकामाची गुणवत्ता आणि शासकीय निधीच्या विनियोगाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे.

डीएलसी आणि पीक्यूसीच्या जाडीची तपासणी करण्याची मागणी

संबंधित रस्त्याच्या बांधकामातील डीएलसी (DLC) आणि पीक्यूसी (PQC) काँक्रीटच्या थरांची जाडी मंजूर अंदाजपत्रक व निर्धारित तांत्रिक निकषांनुसार आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष मोजमाप आणि आवश्यक प्रयोगशाळा चाचण्यांद्वारे पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच काँक्रीटची गुणवत्ता व मजबुती तपासून अधिकृत तांत्रिक अहवाल प्राप्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नालीतील गळती आणि पुलाच्या रिटेनिंग वॉलचा मुद्दा ऐरणीवर

संबंधित नालीमध्ये गळती होत असल्याच्या तक्रारींची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून बांधकामातील दोष, सांध्यांची गुणवत्ता आणि पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तपासावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुलाच्या रिटेनिंग वॉलच्या मागील भरावामध्ये काळ्या मातीचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या बाबीची तांत्रिक तपासणी करून मंजूर आराखडा व बांधकाम मानकांनुसार काम झाले आहे किंवा नाही, हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करा

बांधकामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित शाखा अभियंत्याची भूमिका तसेच कंत्राटदाराच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करावी. कामाच्या प्रक्रियेत संगनमत, कर्तव्यात कसूर किंवा आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेने केली आहे.

मोजमाप पुस्तिका, देयके आणि प्रत्यक्ष कामाची पडताळणी करा

सदर कामाच्या मंजूर अंदाजपत्रकाची, प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची, कार्यादेशाची, मोजमाप पुस्तिकेची (Measurement Book) आणि कंत्राटदाराला अदा करण्यात आलेल्या देयकांची प्रत्यक्ष कामाशी तुलना करण्यात यावी. कामाचा दर्जा, प्रमाण किंवा देयकांमध्ये अनियमितता आढळल्यास शासनाचे आर्थिक नुकसान निश्चित करून नियमानुसार वसुली व पुढील कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडून स्वतंत्र तपासणीची मागणी

संबंधित कामाची नियमित देखरेख करणाऱ्या यंत्रणेपासून स्वतंत्र सक्षम तांत्रिक पथकामार्फत तपासणी करण्यात यावी. दक्षता व गुण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष स्थळपाहणी, आवश्यक तांत्रिक चाचण्या व मोजमाप करून सविस्तर लेखी अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत गंभीर अनियमितता आढळल्यास संबंधित शाखा अभियंत्यावर नियमानुसार निलंबनाची कार्यवाही करावी, तसेच दोष सिद्ध झाल्यास विभागीय कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

दोषपूर्ण कामाची दुरुस्ती आणि दोषींवर कारवाईची मागणी

तपासणीत बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदाराकडून नियमानुसार स्वखर्चाने दुरुस्ती करून घ्यावी. आर्थिक अनियमितता, बनावट मोजमाप किंवा शासकीय निधीच्या गैरवापराचे पुरावे आढळल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी. आवश्यकतेनुसार कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या निवेदनासोबत संबंधित रस्ते व नाली बांधकामाची छायाचित्रे जोडण्यात आली आहेत. प्रशासनाने केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष स्थळपाहणी व तांत्रिक तपासणीच्या आधारे निष्पक्ष चौकशी करावी. तसेच चौकशीचा निष्कर्ष आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी नितीन सोनवणे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी