महावितरणच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा सौरऊर्जा प्रकल्प रखडला
महावितरणच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा सौरऊर्जा प्रकल्प रखडला!
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित; आठवडाभरात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
बीड : (दि.२०) बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी नसतानाही तब्बल एक लाख रुपयांचे वीजबिल आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही वीजबिलात दुरुस्ती करण्यात आलेली नाही. थकीत वीजबिल भरल्यानंतरच सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याच्या भूमिकेमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोग्य केंद्रातील सौरऊर्जा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा आणि अवाजवी वीजबिल आकारण्यास जबाबदार असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.
चऱ्हाटा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटकर यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांसमवेत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या बीड विभागाचे सहाय्यक अभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले होते.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांची भेट घेऊन प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला आकारण्यात आलेले अवाजवी वीजबिल, सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यातील अडथळे आणि महावितरणच्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या प्रकरणातील सर्व मुद्दे आठवडाभरात मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेख युनुस चऱ्हाटकर यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सरफराज पठाण उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जा प्रकल्प तातडीने सुरू करा!
— डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. लसींची योग्य तापमानात साठवणूक, प्रसूतिगृहातील सेवा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर वीजखर्चात बचत करून आरोग्य केंद्रांना ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सौरऊर्जा प्रकल्प केवळ अवाजवी वीजबिलाच्या प्रश्नामुळे रखडत असेल, तर ही बाब गंभीर आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणात प्राधान्याने लक्ष घालून आठवडाभरात सर्व प्रश्न सोडवावेत आणि जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सौरऊर्जा प्रकल्पांचाही आढावा घ्यावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली.
Comments
Post a Comment