फटाके विरहित, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा,विद्यार्थ्यांना प्राचार्य डी. जी. तांदळे यांचे आवाहन; प्रगती विद्यालयात पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
फटाके विरहित, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा,विद्यार्थ्यांना प्राचार्य डी. जी. तांदळे यांचे आवाहन; प्रगती विद्यालयात पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
बीड प्रतिनिधी:-
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण आहे. मात्र, फटाक्यांच्या अतिवापरामुळे होणारे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि पशुपक्ष्यांना होणारा त्रास लक्षात घेता विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य डी. जी. तांदळे यांनी केले.
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता नगर रोडवरील प्रगती विद्यालयात विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप कंठाळे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य तांदळे म्हणाले की, दिवाळीचा खरा आनंद हा फटाके फोडण्यात नसून कुटुंबीयांसोबत आनंद वाटण्यात, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आणि परिसर स्वच्छ ठेवण्यात आहे. फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा श्वसनावर परिणाम होतो, तर मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुपक्ष्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न फोडण्याचा संकल्प करावा आणि आपल्या कुटुंबीयांनाही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
मुख्याध्यापक दिलीप कंठाळे यांनीही विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी ओळखून दिवाळीत स्वच्छता, वृक्षसंवर्धन, पाण्याची बचत आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असे मत व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आज पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. फटाक्यांवरील अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे, वृक्षलागवड करणे आणि समाजातील वंचित घटकांना मदत करणे अशा विधायक उपक्रमांना प्राधान्य द्यावे.
आनंदाचा दिवा प्रत्येकाच्या घरात उजळू द्या; मात्र प्रदूषणाचा धूर नको, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. पर्यावरणपूरक दिवाळीचा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment