पिंपरनई येथील शेतकऱ्याची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरनई येथील शेतकऱ्याची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
दुष्काळ व मुलीच्या लग्नाच्या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल? – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि. ०३)बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील पिंपरनई येथील शेतकरी विक्रम बाबासाहेब दाभाडे (वय ४४ वर्षे) यांनी शनिवारी सकाळी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
विक्रम दाभाडे हे दररोज नित्यनेमाने दूध घालून तसेच शेतातील गाय बांधून घरी परतत असत. मात्र शनिवारी ते नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने त्यांची मुलगी साक्षी दाभाडे त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेली. त्यावेळी विक्रम दाभाडे हे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, दुष्काळी परिस्थिती आणि मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चामुळे विक्रम दाभाडे हे आर्थिक विवंचनेत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. मात्र आत्महत्येचे नेमके कारण संबंधित तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
विक्रम दाभाडे यांच्या पश्चात पत्नी अश्विनी विक्रम दाभाडे, मुले प्रशांत (वय २२), सुशांत (वय २०)आणि मुलगी साक्षी (वय १८) तसेच वडील बाबासाहेब देवराव दाभाडेआणि आई सुंदरबाई बाबासाहेब दाभाडे** असा परिवार आहे.
दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकरी कुटुंबांवर निर्माण होणाऱ्या संकटाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.
Comments
Post a Comment