शासकीय निर्देश असूनही बागपिंपळगावमधील निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करण्याची कार्यवाही प्रलंबित

शासकीय निर्देश असूनही बागपिंपळगावमधील निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करण्याची कार्यवाही प्रलंबित

 ग्रामपंचायत कार्यालयाच्या विरोधात अतिक्रमणधारक बेमुदत धरणे आंदोलन करणार 
गेवराई : (प्रतिनिधी) दि.२८ ऑक्टोंबर २०२६ - 
       गेवराई तालुक्यातील मौजे बागपिंपळगाव येथील गट क्रमांक ३५ मधील शासकीय गायरान जमिनीवर सन १९९० पूर्वीपासून निवास करणाऱ्या १३ अनुसूचित जातीच्या लाभधारकांनी आपली निवासी अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमानुकुल करून घेण्यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समितीकडे आणि ग्रामपंचायत कार्यालयाकडे कायदेशीररित्या सलग ६ वर्षे पाठपुरावा केला आहे. मात्र, सहा वर्षांनंतरही या प्रकरणाची कार्यवाही पूर्ण न झाल्याने लाभधारक यांना त्यांचे जागेचे मालकी हक्क मिळालेले नाहीत.
      बागपिंपळगाव येथील गट क्रमांक ३५ मधील जमिनीवर महेंद्र मुरलीधर कांबळे, सुभाष पुंजाराम सौंदरमल, सुधाकर लक्ष्मण कांबळे अशा एकूण १३ अतिक्रमणधारकांची निवासी अतिक्रमणे आहेत. या सर्व लाभधारकांनी शासनाच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी दि. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी, तहसीलदार गेवराई यांनी दि. २७ जुलै २०२० रोजी तर गटविकास अधिकारी, पंचायत समिती गेवराई यांनी दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी संबंधित मौजे बागपिंपळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. परंतु ग्रामसेवक आणि सरपंच यांनी अतिक्रमण धारकांचा प्रश्न निकालीत काढण्यासाठी अतिक्रमणधारकांचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही.
      राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार दि. १ जानेवारी २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासंबंधी दि. २५ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय काढला आहे. या निर्णयान्वये पात्र नागरिकांच्या निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया राज्यात सुरू झाली असून, संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तथापि, बागपिंपळगाव येथील अतिक्रमण धारकांचे प्रस्तावा संदर्भाने स्पष्ट शासकीय निर्देश असूनही ग्रामपंचायत स्तरावरील कार्यवाही पूर्ण होत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
     या प्रकरणी अतिक्रमणधारकांनी तहसीलदार गेवराई आणि पंचायत समिती गेवराई यांना झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कडुदास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवेदन देऊन प्रलंबित कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याची तसेच जबाबदारी न बजावणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत न्याय मिळाला नाही तर सर्व अतिक्रमणधारक सहपरिवार सहकुटुंब बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मसू बन्सी कांबळे, सुभाष पुंजाराम सौंदरमन, सुधाकर लक्ष्मण कांबळे, विशाल सुभाष सौंदरमल, सावित्रीबाई दशरथराव कांबळे, सतीश सुभाष सौंदरमल, रमेश दशरथ कांबळे, संदीप सुधाकर कांबळे, विष्णू मसुदेव कांबळे, सुमित सुधाकर कांबळे, महादेव दशरथ दळवी, भारत दशरथराव कांबळे, महेंद्र मुरलीधर कांबळे यांच्या प्रामुख्याने सह्या आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी