पोलिसांवरील हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांना न्यायालयाचा दणका; दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले
पोलिसांवरील हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांना न्यायालयाचा दणका; दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले!
ॲड. तेजस नेहरकर यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक!
बीड दि.३० (प्रतिनिधी)-रात्री जेवण करून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर मोटर सायकलला साईड देण्यावरून आणि हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय असून आरोपींविरुद्ध ठोस पुरावे असल्याचा भक्कम युक्तिवाद प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. तेजस नेहरकर यांनी न्यायालयात मांडला, ज्याची दखल घेत न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की,
दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी धीरज कल्याण खांडेकर हे त्यांच्या मित्रासोबत रात्री जेवण करून घरी जात होते. यावेळी 'हॉर्न का वाजवतोस?' अशी विचारणा करत ४ ते ५ जणांनी मिळून खांडेकर यांना गंभीर मारहाण केली. त्या नंतर धीरज खांडेकर यांच्या फिर्यादीवरून
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०९, ११८(२), १८९, १९१, १९०(१२२) अन्वये गुन्हा नंबर ३०३/२०२६ नुसार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रज्वल दीपक मस्के याला अटक केली होती, तर राहुल राजू कदम या विधी संघर्षग्रस्त बालकाने ॲड. पूजा कदम यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
न्यायालयात भक्कम युक्तिवाद
दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी या दोन्ही अर्जांवर न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ॲड. तेजस नेहरकर यांनी उत्कृष्ट युक्तिवाद करत आरोपींना जामीन देऊ नये, असे जोरदार मुद्दे मांडले. पोलिसांवर झालेला हल्ला हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा असून अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करत त्यांनी आरोपींच्या गुन्ह्याची तीव्रता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने
ॲड. तेजस नेहरकर यांचा युक्तिवाद गृहीत धरून दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर करत फेटाळून लावले.
या कायदेशीर लढ्यात सहाय्यक सरकारी वकील ॲड. बी. एस. राख यांनी विशेष सहकार्य केले. तसेच ॲड. गौतमजी नाईकवाडे, ॲड. रविराज व्ही. राठोड, ॲड. खांडेकर, ॲड. शेलार, ॲड. कौस्तुभ गलधर आणि ॲड. शेंडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment