११५ कोटींची भूमिगत गटार योजना वादात; प्रबुद्धनगर, भीमनगरमध्ये उघड्या चेंबरचा मृत्यूचा सापळा

११५ कोटींची भूमिगत गटार योजना वादात; प्रबुद्धनगर, भीमनगरमध्ये उघड्या चेंबरचा मृत्यूचा सापळा

दुचाकीस्वार पडून जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी स्वतःच बुजवले जीवघेणे खड्डे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :परळी वैजनाथ शहरात तब्बल ११५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील प्रबुद्धनगर आणि भीमनगर परिसरात गटार योजनेचे चेंबर उघडेच राहिल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत दगड, माती आणि सिमेंटचे तुकडे टाकून हे जीवघेणे खड्डे बुजवले.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उघड्या चेंबरमुळे आतापर्यंत दोन ते तीन नागरिक दुचाकीसह खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी हे उघडे चेंबर मोठा धोका ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात खड्डे दिसत नसल्याने गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी चेंबर उघडे आणि काम अर्धवट असल्याचे चित्र समोर येत आहे. संबंधित गुत्तेदारांनी काम अपूर्ण अवस्थेत सोडल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्याने नागरिकांनाच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.

या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते अमर रोडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ११५ कोटी रुपयांच्या योजनेत नागरिकांच्या सुरक्षेची अशी हेळसांड होत असेल, तर या कामाच्या गुणवत्तेची आणि खर्चाची सखोल चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून शहरातील सर्व उघड्या चेंबरवर तातडीने सुरक्षित आरसीसी झाकणे बसवावीत. उद्या एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अमर रोडे हे पुराव्यांसह नगर परिषद मुख्याधिकारी आणि बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करणार आहेत. आता तरी नगर परिषद प्रशासन जागे होऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार का, की एखाद्या मोठ्या अपघातानंतरच प्रशासनाला जाग येणार, असा सवाल प्रबुद्धनगर आणि भीमनगरमधील नागरिक उपस्थित करत आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी