सेवानिवृत्त बालविकास प्रकल्प अधिकारी सौ सुनंदा यशवंतराव तांदळे यांचे दुःखद निधन
सेवानिवृत्त बालविकास प्रकल्प अधिकारी सौ सुनंदा यशवंतराव तांदळे यांचे दुःखद निधन
बीड प्रतिनिधी :-बीड जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सौ सुनंदा यशवंतराव तांदळे(बाबासाहेब जायभाये) यांचे अल्पशा आजाराने 26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये अंकुश नगर स्मशानभूमी येथे सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना या प्रकल्पांतर्गत 1998 साली जालना जिल्हा परिषद येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून त्यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. बीड जिल्ह्यामध्ये 2005 साली नवगण राजुरी येथे सर्वप्रथम पर्यवेक्षिका म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. स्वकर्तृत्वावर त्यांनी थेट बालविकास प्रकल्प अधिकारी या पदापर्यंत मजल मारली. या पदांतर्गत त्यांनी बीड आणि बीड ग्रामीण या दोन्ही विभागांमध्ये आपल्या सेवेच्या कार्यकाळात धडाकेबाज काम केले. त्या निर्भीड आणि स्पष्ट वक्त्या महिला अधिकारी म्हणून परिचित होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अंगणवाडीला नंदनवन करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला. या विभागांतर्गत अनेक महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून हजारो कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अतिशय संघर्षातून शासकीय सेवेत संधी मिळवली. आणि या संधीचे सोने करत त्यांनी आपली शासकीय सेवा कर्तुत्वाने गाजवली. मागील काही वर्षापासून त्या कॅन्सर आजाराने त्रस्त होत्या. या आजारालाही न घाबरता त्यांनी तब्बल नऊ वर्ष संघर्ष केला. आजारी असतानाही शासकीय सेवेत कुठेही खंड पडू दिला नाही. कर्तव्यनिष्ठतेने शासकीय सेवा केली. त्या ३० ऑगस्ट २०२५ रोजी वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. मागील काही दिवसांपासून त्या आजाराने त्रस्त झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना 26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बीड शहरातील अंकुश नगर येथील स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.आज 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता राखेचा दिवस असून शिरूर कासार येथील सिद्धेश्वर मंदिर येथे दशक्रिया विधी होणार आहे. तांदळे जायभाये कुटुंबीयावर कोसळलेल्या दुःखात न्यूज 23 मराठी परिवार सहभागी आहे.
Comments
Post a Comment