केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा:विलास जोगदंड यांचे बीडकरांना आवाहन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा:विलास जोगदंड यांचे बीडकरांना आवाहन

१६ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये विराट जाहीर सभा
बीड, दि. ११ (प्रतिनिधी) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बीड शहरात विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीड येथे दुपारी ठीक ४ वाजता ही सभा होणार आहे. या सभेला रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, गायरानधारक, विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करावी, असे आवाहन रिपाइंचे बीड जिल्हा सचिव विलास जोगदंड यांनी केले आहे.
राज्यासह मराठवाडा आणि बीड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतमजूर व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी सभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतमजूर, कामगार आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
याशिवाय अनुसूचित जातींमधील ५९ जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करावी, २०११ पर्यंत कसत असलेल्या गायरान जमिनींसंदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आणि महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, अशा विविध मागण्यांचा पाठपुरावा या सभेतून करण्यात येणार आहे.
विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
शेतकरी, शेतमजूर, गायरानधारक, विद्यार्थी, महिला आणि कामगारांच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळावा, या उद्देशाने ही विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बीड शहर व जिल्ह्यातील रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक घटकांनी शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे उपस्थित राहावे आणि सभा यशस्वी करावी, असे आवाहन रिपाइंचे बीड जिल्हा सचिव विलास जोगदंड यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी