पिक कर्जासाठी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर अँड. गणेश वाणी यांचे उपोषण
पिक कर्जासाठी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर अँड. गणेश वाणी यांचे उपोषण
शाखा व्यवस्थापक सोन्याबापू रासकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित; मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांची मध्यस्थी
लिंबागणेश (दि.०१) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरल्यानंतरही पिक कर्ज मिळत नसल्याच्या मागणीसाठी अँड. गणेश वाणी यांनी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर सहकाऱ्यांसमवेत गुरुवार, दि. १ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले. पिक कर्ज मिळावे यासाठी बँकेकडे लेखी अर्ज करूनही कर्ज प्रक्रिया पुढे न गेल्याने त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते.
मंडळ अधिकारी व तलाठ्यांची मध्यस्थी
उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर लिंबागणेश महसूल मंडळाच्या मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अँड. गणेश वाणी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक सोन्याबापू रासकर यांच्याशी चर्चा केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी मध्यस्थी केली.
यावेळी बँकेच्या वतीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीने (SLBC) दि. ८ जुलै २०२४ रोजी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार केवळ CIBIL स्कोअरच्या आधारे पिक कर्ज नाकारले जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बँकेच्या म्हणण्यानुसार, कर्ज प्रस्तावाच्या छाननी प्रक्रियेत वसुलीसाठी दाखल असलेली दिवाणी प्रकरणे, इतर कर्जांची थकबाकी तसेच वैयक्तिक व जामीनदार म्हणून असलेली थकीत देयके यांची तपासणी केली जाते. संबंधित कर्ज धोरणानुसार प्रस्तावावर निर्णय घेतला जातो. या कारणांमुळे त्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी स्वीकारता येत नसल्याचे यापूर्वी लेखी कळविण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
उपोषणस्थळी मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, तलाठी गणपत पोतदार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या उपस्थितीत अँड. गणेश वाणी यांच्याशी शाखा व्यवस्थापक सोन्याबापू रासकर यांनी चर्चा केली. संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती देऊन सकारात्मक भूमिका घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शाखा व्यवस्थापकांच्या आश्वासनानंतर अँड .गणेश वाणी यांनी आपले उपोषण स्थगित केले.
यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात ,रमेश गायकवाड, अशोकराजे वाणी,कैलास गायकवाड, राजाभाऊ पाटील, कचरू निर्मळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment