मोटार न लावताच बोअरवेलमधून पाणी वाहू लागले; भाविकांमध्ये कुतूहल
मोटार न लावताच बोअरवेलमधून पाणी वाहू लागले; भाविकांमध्ये कुतूहल
श्रीक्षेत्र ईश्वरभारतीबाबा बेलेश्वर संस्थानच्या इनामी जमिनीत बोअरवेलला लागले पाणी; मोटारविनाच पाण्याची धार सुरू!
सद्गुरू ईश्वरभारतींची कृपा असल्याची मठाधिपती महादेव महाराज भारती यांची भावना; चमत्कार पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
लिंबागणेश : (दि.३०)ऐन दुष्काळात सर्वत्र साठवण तलाव, विहिरी कोरड्या पडलेल्या असताना आणि अनेक बोअरवेल बंद पडलेल्या असताना बीड तालुक्यातील बालाघाटावरील बेलेश्वर संस्थानच्या इनामी जमिनीतील नव्याने घेतलेल्या बोअरवेलमधून मोटार न लावताच पाणी वाहू लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त होत असून, सद्गुरू ईश्वरभारती बाबांची कृपा असल्याची भावना मठाधिपती महंत महादेव महाराज भारती यांनी व्यक्त केली आहे.
बीड तालुक्यातील बालाघाटाच्या कुशीत असलेल्या सद्गुरू ईश्वर बाबा भारती यांच्या पावनभूमीत मुळुकवाडी शिवारातील चांभारशेती येथे बेलेश्वर संस्थानची सुमारे ६५ एकर इनामी जमीन आहे. या शेतात काल दि.२९ रोजी रात्री बोअरवेल घेण्यात आला. त्यावेळी बोअरमध्ये मुबलक पाणी आढळून आले नव्हते.
मात्र, आज सकाळी बेलेश्वर मंदिरात जाऊन शंभू महादेव आणि सद्गुरू ईश्वरभारती बाबांची विधिवत पूजा-अर्चना केल्यानंतर मठाधिपती महंत महादेव महाराज भारती शेतात आले. त्यावेळी बोअरवेलमध्ये मोटार न टाकताच त्यातून पाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा अनुभव सद्गुरू ईश्वरभारती बाबांच्या कृपाशीर्वादामुळेच मिळाल्याची भावना महादेव महाराज भारती यांनी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झालेले असताना दुसरीकडे मोटार न लावताच बोअरवेलमधून पाणी वाहू लागल्याची घटना दिवसभर परिसरात चर्चेचा विषय ठरली. हा प्रकार पाहण्यासाठी भाविकांनी शेतात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
Comments
Post a Comment