दसऱ्याच्या तोंडावर २०८ कामगारांना काढण्याची नोटीस दिल्याने खळबळ
वाळूजमधील विप्रो लायटिंगचा कामगारांवर अन्याय
दसऱ्याच्या तोंडावर २०८ कामगारांना काढण्याची नोटीस दिल्याने खळबळ
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी :-वाळूज औद्योगिक वसाहतीतील विप्रो लायटिंग कंपनीने ऐन सणासुदीच्या आणि दसऱ्याच्या तोंडावर २०८ कामगारांना नोटीस देऊन १० डिसेंबरपर्यंत सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ३० ते ३३ वर्षे कंपनीसाठी प्रामाणिकपणे रक्त आटवणाऱ्या कामगारांना तुटपुंजा पगार देऊन आणि अचानक उत्पादन बंद करून वाऱ्यावर सोडल्याबद्दल कामगारांमध्ये तीव्र संताप व निराशा व्यक्त होत आहे.
देशातील महान दानशूर उद्योगपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजीम प्रेमजी यांच्या मालकीच्या या कंपनीत आपल्या तरुण वयाची ३० वर्षे खर्ची करणाऱ्या कामगारांना आज अत्यंत अपमानास्पद आणि हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून नवीन वेतन कराराची मागणी प्रलंबित असताना, कंपनीने जाणूनबुजून उत्पादन कमी केले आणि आता स्वेच्छा निवृत्ती किंवा कामावरून कमी करण्याच्या नोटीस दिल्या आहेत.
संबंधित कामगारांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, मालकांनी कामगारांच्या पाठीशी उभे राहून सन्मानजनक आर्थिक भरपाई द्यावी किंवा आमचा सेवाकाळ पूर्ण होऊ द्यावा, जेणेकरून जगात आमच्या मालकाचा खरा दानशूरपणा दिसून येईल.या अन्यायकारक निर्णयाविरोधात कामगारांमध्ये दुःखाचे वातावरण असून, प्रशासनाने व व्यवस्थापनाने यात तातडीने लक्ष घालावे, अशी आर्त हाक कामगारांनी दिली आहे.
Comments
Post a Comment