कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी पाडसाला जीवदान

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी पाडसाला जीवदान!

 सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने वनविभागाकडून पाडसाला ताब्यात
वनरक्षक महेश मेटे यांनी वनकर्मचारी पाठवून केली मदत; बालाघाट परिसरातील वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

लिंबागणेश : (दि.२६) बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका पाडसाला जीवदान देण्यात यश आले. शेतकरी अंगद लक्ष्मण ढास यांनी जखमी अवस्थेत आढळलेल्या पाडसाला पाणी पाजून घरी आणले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी वनविभागाशी संपर्क साधून पाडसाला मदत मिळवून दिली.

मुळुकवाडी शिवारातील अंगद लक्ष्मण ढास यांच्या मागिरा शिवारातील शेतात दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले पाडस आढळून आले. पाडसाच्या डोक्याला जखमा झाल्याचे दिसून आले. ढास यांनी त्याला पाणी पाजून घरी आणत त्याची काळजी घेतली.

दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांना दूरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर डॉ. ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी पाडसाची पाहणी केली. त्यांनी वनरक्षक महेश मेटे यांच्याशी संपर्क साधून पाडसाचे फोटो व व्हिडिओ पाठवले आणि वनकर्मचारी तातडीने पाठविण्याची विनंती केली.

या माहितीची दखल घेत वनरक्षक महेश मेटे यांनी वनकर्मचारी घटनास्थळी पाठवले. वनकर्मचाऱ्यांनी जखमी पाडसाला ताब्यात घेतले. त्यामुळे वेळेत मदत मिळाल्याने पाडसाच्या उपचारासाठी पुढील कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा झाला.

पाण्याअभावी वन्यजीवांची भटकंती; पाणवठे भरण्याची मागणी

बालाघाट परिसरात पावसाअभावी तलाव आणि जलस्रोत आटल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळत असून, अशा वेळी कुत्र्यांच्या हल्ल्यांत वन्यप्राणी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होण्याच्या घटनाही चिंताजनक आहेत.

वन्यजीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि त्यांचे जीव वाचावेत, यासाठी वनविभागाने जंगल परिसरातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी