मुख्यमंत्री साहेब, ५ हजारांची भीक नको; शेतकऱ्यांना हक्काचे ५० हजार द्या
मुख्यमंत्री साहेब, ५ हजारांची भीक नको; शेतकऱ्यांना हक्काचे ५० हजार द्या!
शेतकरी हक्क मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन; राजेंद्र आमटे यांचा सरकारला सवाल
बीड (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिके हातची गेली आहेत. पेरणीपासून ते काढणीपर्यंत केलेला खर्च मातीत गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले असताना सरकारकडून भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याने शेतकरी हक्क मोर्चाने संताप व्यक्त केला आहे. ‘मुख्यमंत्री साहेब, पाच हजारांची भीक नको; शेतकऱ्यांना हक्काचे ५० हजार रुपये द्या,’अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी भरीव नुकसानभरपाई देण्याऐवजी पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी प्रतीकात्मकरीत्या भीक मागून रुपये जमा करत. ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिवाळी साजरी करण्यासाठी पाठविण्याच्या भूमिकेतून आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध केला.
तेलाच्या डब्यासाठीच हजारो रुपये; मग दिवाळी कशी साजरी करायची?
‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. बाजारात तेलाचा डबा खरेदी करण्यासाठीच सुमारे २,८०० रुपये खर्च येत असेल, तर पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची? मुलाबाळांचे सणासुदीचे खर्च कसे भागवायचे? शेतीत गुंतवलेले पैसेही वसूल झालेले नसताना शेतकऱ्यांनी संसार कसा चालवायचा, असे सवाल राजेंद्र आमटे यांनी उपस्थित केले.
शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याऐवजी त्यांच्या नुकसानीचा गांभीर्याने विचार करून दिवाळीपूर्वी प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये नुकसानभरपाई जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पीकविमा आणि नुकसानभरपाई तातडीने द्या
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा तातडीने मिळावा, तसेच दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, रामधन जमाले, अशोक येडे, शेख युनुस, , बाजीराव ढाकणे, डॉ.संजय तांदळे, हनुमान घोडके, ज्ञानेश्वर राऊत,बळीराम म्हेत्रे,खाजाभाई पठाण,राजाभाऊ साळुंखे, किष्किंधा पांचाळ ,अशोक सुरवसे, गणेश वटारे, संतोष म्हेत्रे,बबन आमटे,सुदाम करपे, माऊली शिंदे, राजाभाऊ वीर,पठाण सरफराज, नारायण म्हेत्रे, श्रीकांत ठाकरे, कृष्णा राठोड, सुभाष गिराम
यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या.
- पात्र शेतकऱ्यांचा प्रलंबित पीकविमा तातडीने अदा करा.
- दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची योग्य भरपाई द्या.
- शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न देता प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक सहाय्य द्या.
.
Comments
Post a Comment