भीमराज नगर बुद्ध विहारात वर्षावासमहिलांकडून तीन महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे सामूहिक वाचन; भव्य धम्म रॅलीने राजुरवेस परिसर धम्ममय

भीमराज नगर बुद्ध विहारात वर्षावास
महिलांकडून तीन महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे सामूहिक वाचन; भव्य धम्म रॅलीने राजुरवेस परिसर धम्ममय
बीड (प्रतिनिधी) :भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार, धम्माचे आचरण आणि समाजात शील-सदाचाराची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने भीमराज नगर बुद्ध विहार, राजुर वेस येथे आयोजित तीन महिन्यांच्या वर्षावासाचा समारोप गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात करण्यात आला. पूज्य भंते बुद्धघोष यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या या वर्षावासाने परिसरात धम्मविचारांचा जागर घडवून आणला.

आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चाललेल्या या वर्षावासाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित *‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’* या ग्रंथाचे भीमराज नगर येथील महिलांनी आळीपाळीने सलग तीन महिने दररोज केलेले वाचन होय. महिलांनी दाखविलेली ही धम्मनिष्ठा आणि सामूहिक सहभाग परिसरासाठी प्रेरणादायी ठरला. या ग्रंथवाचनाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, समता, स्वातंत्र्य, बंधुता, करुणा आणि प्रज्ञेचे विचार घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वर्षावासाच्या समारोपानिमित्त भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध वंदना आणि धम्मघोषाच्या जयघोषात निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण राजुर वेस परिसर धम्ममय झाला होता. रॅलीमध्ये उपासक-उपासिका, महिला, युवती, बालक-बालिका यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः महिला आणि तरुणींचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरला. यावेळी भोजनदान आणि चिवरदानासारख्या पुण्यकर्मांतून वर्षावासाची सांगता करण्यात आली.

तीन महिन्यांच्या वर्षावास काळात पूज्य भंते बुद्धघोष यांनी धम्माचे महत्त्व, पंचशीलाचे पालन, शील-सदाचार आणि दैनंदिन जीवनात बुद्धविचारांचे आचरण याविषयी सातत्याने मार्गदर्शन केले. केवळ धम्माचे श्रवण न करता बुद्धांचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरविणे आवश्यक आहे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये धम्माविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली.

वर्षावासाच्या संपूर्ण कालावधीत परिसरातील नागरिकांनी पूज्य भंते बुद्धघोष यांची मनोभावे सेवा केली. ‘पुण्यकर्म हे माणसाचे खरे भूषण आहे,’ असे सांगत त्यांनी दान पारमितेचे महत्त्वही अधोरेखित केले. दान, सेवा, सदाचार आणि परोपकार हीच मानवतावादी जीवनाची खरी मूल्ये असल्याचा विचार त्यांनी आपल्या प्रवचनातून उपासकांना समजावून सांगितला.

*महिलांच्या ग्रंथवाचनातून धम्मसंस्कारांचा जागर!*

तीन महिन्यांच्या या वर्षावासाने भीमराज नगर परिसरात धम्मनिष्ठा, सामाजिक एकोपा आणि सदाचाराची भावना अधिक दृढ करण्यास हातभार लावला. विशेष म्हणजे महिलांनी सातत्याने केलेले ग्रंथवाचन, धम्म रॅलीतील उत्स्फूर्त सहभाग आणि भोजनदान-चिवरदान यांसारख्या उपक्रमांमुळे हा समारोप सोहळा संस्मरणीय ठरला. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रेरणादायी संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी