गावात मिळेना मोबाईल रेंज; कृषी सहाय्यकासह शेतकऱ्यांची डोंगरमाथ्यावर धाव
गावात मिळेना मोबाईल रेंज; कृषी सहाय्यकासह शेतकऱ्यांची डोंगरमाथ्यावर धाव!
बालाघाटातील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांची व्यथा; ई-पीक पाहणी, पीकविमा आणि महाडीबीटी अर्जांसाठी नेटवर्कचा अडथळा
शासनाच्या ऑनलाइन योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत; ई-पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक त्रुटी दूर करून गावपातळीवर तांत्रिक मदत उपलब्ध करून द्या :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.२७) : बीड तालुक्यातील बालाघाटाच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये मोबाईल नेटवर्कअभावी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात मोबाईलला रेंज मिळत नसल्याने ऑनलाइन अर्ज, आधार आधारित ओटीपी, ई-पीक पाहणी आणि पीक पेरा नोंदणीची प्रक्रिया रखडत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी थेट डोंगरमाथ्यावर जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
बीड तालुक्यातील मौजे फुकेवाडी येथे दि. २७ रोजी कृषी सहाय्यक रामेश्वर पेजगुडे हे महिला शेतकरी प्रमाणपत्र आणि रब्बी हंगाम २०२६-२७ साठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने गेले असता, गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांना डोंगरमाथ्यावर घेऊन जाऊन ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागली.
आधार ओटीपीसाठी डोंगरमाथ्यावर जाण्याची वेळ!
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र तसेच रब्बी बियाणे अनुदान योजनेंतर्गत प्रमाणित बियाणे व मिनीकिट योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेत आधार आधारित ओटीपी आवश्यक असतो. मात्र, गावात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया पूर्ण करताना शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.
याबाबत कृषी सहाय्यक रामेश्वर पेजगुडे यांनी सांगितले की, गावात नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांना सोबत घेऊन डोंगरमाथ्यावर जावे लागते. तेथे मोबाईल रेंज मिळाल्यानंतरच ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर करा!
ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे इंटरनेटची मर्यादित सुविधा असून, ऑनलाइन प्रक्रियेविषयी पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने ई-पीक पाहणीची नोंदणी डोकेदुखी ठरत आहे. अनेकदा शेतात फिरूनही मोबाईलला नेटवर्क मिळत नाही, लाईव्ह लोकेशन निश्चित होत नाही किंवा अक्षांश-रेखांश जुळत नसल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
पीक नोंदणी वेळेत पूर्ण न झाल्यास पीकविमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवताना अडचणी निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात : डॉ. गणेश ढवळे
बालाघाटाच्या डोंगराळ भागातील गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर असून, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी डोंगरमाथ्यावर जावे लागणे ही चिंतेची बाब आहे. ई-पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी आणि प्रत्येक गावपातळीवर तांत्रिक मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच नेटवर्कअभावी वेळेत नोंदणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसानभरपाईच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment