भीमाशंकर अभयारण्य परिसरातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पासाठी वृक्षतोडीला विरोध

भीमाशंकर अभयारण्य परिसरातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पासाठी वृक्षतोडीला विरोध!

 पर्यावरणाचा -हास करणा-या "झाडखाऊ"आणि भांडवलदारधार्जिण्या "भाडखाऊ" सरकारच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी — डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.२६) रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या सायडोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पासाठी सुमारे ६०० एकर क्षेत्रातील ३५ हजारांहून अधिक वृक्षांची तोड होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरू (विशाल खार) या दुर्मिळ वन्यजीवाच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, या मागणीसाठी सोमवारी (दि.२६) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भांडवलदारधार्जिण्या धोरणांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

 शेकरूच्या नैसर्गिक अधिवासावर संकट येण्याची भीती

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. या परिसरात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूचा नैसर्गिक अधिवास आहे. प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास शेकरूसह इतर दुर्मिळ वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पश्चिम घाट हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश असून, येथील जंगलसंपत्ती, वन्यजीव आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली घनदाट वनक्षेत्राचा ऱ्हास होणार असेल, तर अशा प्रकल्पांच्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

 प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी

प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. वनक्षेत्रातील वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची निष्पक्ष चौकशी करावी. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी प्रस्तावित प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले.

पर्यावरण संरक्षणासाठी घोषणाबाजी

या आंदोलनादरम्यान 'पर्यावरण वाचवा, देश वाचवा', 'निसर्ग वाचवा, देश वाचवा' आणि 'झाडे लावा, झाडे जगवा' अशा घोषणा देण्यात आल्या. विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखताना नैसर्गिक वनसंपत्तीचा विनाश होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सरफराज पठाण,रामनाथ खोड, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार,नागेश मिठे पाटील,शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड माजी सैनिक अशोक येडे, शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड सादेक सय्यद, राजेंद्र आमटे ( शेतकरी हक्क मोर्चा आंदोलक), सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोडके, मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रीय किसान सभा भिमराव कुटे, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, प्राचार्य डी.जी.तांदळे (जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा बीड), प्राचार्य राजकुमार कदम, कॉम्रेड सुहास जायभाये ( जिल्हा कोषाध्यक्ष डीवायएफआय), कृष्णा राठोड यांच्यासह पर्यावरणप्रेमी अभिमान खरसाडे सहभागी झाले होते.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी