बीड शहरात भूमीगत गटार योजनेचा बोजवारा,कोट्यवधींचा निधी खर्चूनही योजना कागदावरच
बीड शहरात भूमीगत गटार योजनेचा बोजवारा,कोट्यवधींचा निधी खर्चूनही योजना कागदावरच
आपचे शहर अध्यक्ष सय्यद सादेक यांचा गंभीर आरोप
बीड प्रतिनिधी :बीड शहरातील तेलगाव नाका व लगतच्या परिसरातील भूमीगत गटार योजनेच्या अनागोंदी कारभाराविरोधात आम आदमी पार्टीचे बीड शहर अध्यक्ष सय्यद सादेक यांनी प्रशासनाधिखारी व कंत्राटदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. २०१७-१८ मध्ये सुरू झालेली ही योजना तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश मिळूनही प्रत्यक्षात अपूर्ण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रत्यक्षात कोणतेही भरीव काम झाले नसून केवळ काही ठिकाणी चेंबर (Manholes) बनवून दिशाभूल करण्यात आली आहे. असे असतानाही कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराला तब्बल ४१ लाख ६८ हजार ६७३ रुपयांचे अतिरिक्त बिल कसे अदा केले, असा सवाल सय्यद सादेक यांनी केला आहे.
नगर परिषदेने या योजनेसाठी कोणतीही जागा उपलब्ध करून दिली नसताना तातडीने कार्यारंभ आदेश आणि तांत्रिक मान्यता कशी घेण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनतेचा पैसा खिशात घालण्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अंधारात ठेवून २०२३ मध्ये ही योजना अचानक स्थगित करण्यात आली, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
भूमीगत गटार योजना रखडल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर व गल्लीबोळात पसरत असून, यामुळे बीड शहरात डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
बीड शहराच्या विकासाच्या नावाखाली जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, नगर परिषदेकडून तातडीने जागा उपलब्ध करून घ्यावी आणि रखडलेली भूमीगत गटार योजना लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावी, अशी आक्रमक मागणी आम आदमी पार्टीचे बीड शहर अध्यक्ष सय्यद सादेक यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Comments
Post a Comment