शेतकरी आत्महत्याग्रस्तांविषयी आ. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध!

शेतकरी आत्महत्याग्रस्तांविषयी आ. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध!

लिंबागणेशमध्ये प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त; कठोर कारवाईची मागणी

 शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती; सत्ताधारी आमदारांचे असंवेदनशील वक्तव्य दुर्दैवी — डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (दि २९) : शेतकरी आत्महत्या ही गंभीर सामाजिक आणि कृषीविषयक समस्या असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांविषयी कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, अँड.गणेश वाणी, दामोदर थोरात, सुरेश निर्मळ ,प्रा.लेनाजी गायकवाड, रमेश वाणी, संतोष भोसले, दादाराव येडे, रामदास मुळे, कैलास गायकवाड, शहाजी वाणी , रामदास मुळे, संजय पावले, बिभिषण वाणी , रामदास वाणी आदी सहभागी होते.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये आणि मृतदेह जनावरे खातील तेव्हा शेतकऱ्यांना परिस्थितीची जाणीव होईल, अशा आशयाचे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या वक्तव्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला.

 शेतीच्या संकटामुळे शेतकरी आत्महत्यांकडे

शेतीचा वाढता उत्पादन खर्च, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळणे यांसारख्या समस्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यातच पीक नुकसान आणि कर्जफेडीच्या चिंतेमुळे अनेक शेतकऱ्यांवर मानसिक ताण वाढत असल्याचे डॉ. ढवळे यांनी नमूद केले. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 मराठवाड्यातील आत्महत्यांचा प्रश्न गंभीर

राज्यात जानेवारी २०२२ ते जून २०२६ या कालावधीत १३ हजार ९२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आल्याचा दावा डॉ. ढवळे यांनी केला. तसेच मराठवाड्यात गेल्या नऊ महिन्यांत ७६०, तर बीड जिल्ह्यात १७० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची शासनदरबारी नोंद असल्याचे त्यांनी नमूद केले. या आकडेवारीच्या अधिकृत स्रोताची पडताळणी होणे आवश्यक आहे.

आ. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करा!

शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून गांभीर्याने घेतली पाहिजे. अशा संवेदनशील विषयावर लोकप्रतिनिधींनी बोलताना शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांची जाणीव ठेवली पाहिजे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी करण्यात आल्याचा आरोप असलेले वक्तव्य संतापजनक असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित आमदारांना कठोर समज द्यावी. तसेच राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी