ढेकणमोहा परिसरात भीषण पाणीटंचाई टँकर सुरू करण्याची मागणी
ढेकणमोहा परिसरात भीषण पाणीटंचाई टँकर सुरू करण्याची मागणी
गटविकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन; नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
ढेकणमोहा (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. बीड तालुक्यातील ढेकणमोहा गावासह परिसरातील विविध वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ढेकणमोहा परिसरात तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी मातोश्री रमाबाई आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
ढेकणमोहा गावातील तसेच गावालगतच्या दलित वस्ती, वामन नगर वस्ती, थापडे वस्ती, ब्राह्मणाथ वस्ती, देवकते वस्ती आणि रमाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अपुरी पडत आहे. काही वस्त्यांमध्ये नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. पाण्याची टंचाई केवळ नागरिकांपुरती मर्यादित नसून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांसह पशुधनालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ढेकणमोहा परिसरातील पाणीटंचाईची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा किंवा नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. याबाबत बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने नागरिकांच्या पाणीप्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नागेश शिंदे, शेर हिंद संस्थेचे अध्यक्ष अमर भाई पाशा, नारायण देवकते ग्रामपंचायत सदस्य तथा माजी चेअरमन, महादेव (आप्पा) थापडे, हर्षनी शिंदे, लखन महाराज कानडे, विनोद शिंदे पत्रकार, देवानंद शिंदे ग्रामपंचायत सदस्य, दिलीप शिंदे माजी संचालक यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment