राष्ट्रीय महामार्गावरील भेगांचा प्रश्न ऐरणीवर,बळी गेल्यानंतरच जिल्हा रस्ते सुरक्षा विभागाला जाग येणार का?
राष्ट्रीय महामार्गावरील भेगांचा प्रश्न ऐरणीवर,बळी गेल्यानंतरच जिल्हा रस्ते सुरक्षा विभागाला जाग येणार का?
अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा; वाहनचालकांचा जीव धोक्यात!
मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्ती करा :- डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.१९)खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी वरील माजलगाव ते तेलगाव दरम्यान शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या भीषण अपघातात देवदर्शनासाठी निघालेल्या पाच जणांचा काल जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतरही जिल्ह्यातील अन्य महामार्गांवरील धोकादायक भेगांचा प्रश्न ऐरणीवर आला असून बळी गेल्यानंतर तरी रस्ते सुरक्षा विभागाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपस्थित केला आहे.
अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी हा बीड जिल्ह्यातून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर पसरलेला असून, या रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल ८७८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, या महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान खंडाळा फाटा, जाधववाडी, मुळुकवाडी आणि वैद्यकिन्ही परिसरात रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकींची चाके अडकून वाहनचालकांचे नियंत्रण सुटण्याची आणि अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रस्त्यावरील या भेगांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून, रात्रीच्या वेळी भेगा लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने अपघात घडण्याची वाट न पाहता तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
शिंदेवाडी फाट्यावरील दुर्घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का?
खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी वरील शिंदेवाडी फाट्याजवळ झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी आहे. रस्त्यावरील भेगा, त्यामध्ये दुचाकींची चाके अडकणे आणि चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटणे यांसारख्या कारणांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. अशा घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणांना जाग येणार का ? असा सवाल गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन
अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी वरील धोकादायक भेगांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करावी, रस्त्यावरील भेगा बुजवाव्यात आणि वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
अपघात होण्याची आणि निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याची वाट न पाहता जिल्हा रस्ते सुरक्षा विभागासह संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा, रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीमुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटनांना प्रतिबंध घालण्याचा उद्देशच अपयशी ठरेल, अशी भूमिका डॉ. गणेश ढवळे यांनी मांडली आहे.
Comments
Post a Comment