मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यासाठी ‘आप’चे घंटानाद आंदोलन
आम आदमी पार्टीचे घंटानाद आंदोलन !
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यासाठी ‘आप’चे घंटानाद आंदोलन!
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्यपालांना निवेदन; मतदारांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याची मागणी — अशोक येडे
बीड : (दि. १७) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१७ शनिवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी " घंटानाद आंदोलन" करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले.
मतदारांचे अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी
निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. एसआयआर प्रक्रियेमुळे पात्र मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांवर परिणाम होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मतदार यादीच्या पुनरीक्षणादरम्यान कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकपणे वगळले जाणार नाही, याची निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राखावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग
या घंटानाद आंदोलनात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, जिल्हा संघटक प्रा.ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, तालुकाध्यक्ष कृष्णा जगताप, तालुका उपाध्यक्ष आजम खान, कोषाध्यक्ष कैलासचंद पालीवाल, दत्ता सुरवसे, जिल्हाध्यक्ष इंटक बीड रामधन जमाले, सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस, शेख मुबीन, शेतकरी हक्क मोर्चा आंदोलक राजेंद्र आमटे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.संजय तांदळे, फारूक इनामदार,
आदी सहभागी झाले होते.
मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण, मतदार यादीतील पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी निवडणूक आयोगाने या मागण्यांची दखल घ्यावी, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी मांडली
Comments
Post a Comment