चमत्कार दाखवतो' सांगून प्रवाशांना लुटणारी त्रिकूट जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
माजलगाव / बीड:
माजलगाव बसस्थानकात वयोवृद्ध प्रवाशाला ‘दगडापासून रुद्राक्ष बनवतो आणि चमत्कार दाखवतो’ अशी थापेबाजी करून हाताची हातचलाखी करत सोन्याची अंगठी लांबवणाऱ्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील तीन सराईत गुन्हेगारांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास माजलगाव बसस्थानकावर वयोवृद्ध जगन्नाथ दगडूबा भागवत (रा. परतुर) हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी वडवणी येथे जाण्यासाठी बसले होते. त्या वेळी तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन हातचलाखी केली आणि चमत्कार दाखवतो असे सांगून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी चोरून नेली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करत होते.
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विग्ने व त्यांचे पथक माजलगाव हद्दीत चोरांचा शोध घेत असताना तालखेड फाट्यावर थांबले होते. त्या वेळी दोन मोटारसायकलवरून तोंडाला रुमाल बांधलेले तीन इसम संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील एकजण मोटारसायकल चालू करून माजलगावच्या दिशेने पळून गेला.
मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत जागेवर असलेल्या इतर दोघांना पकडले. पळून गेलेल्या इसमासह त्यांची नावे विचारली असता त्यांनी खालीलप्रमाणे माहिती दिली:
१. आसिफ अजित मदारी (वय २२, रा. विकासवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक)
२. अफजल सलीम मदारी (वय २८, रा. ग्रामपंचायतीच्या पाठीमागे, शिंदे नगर, नाशिक)
३. हुसेन हसन मदारी (वय २७, रा. म्हाडा कॉलनीच्या मागे, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर)
गुन्ह्याची कबुली आणि जप्त मुद्देमाल
पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, या तिघांनी मोटारसायकलने नाशिकहून येऊन माजलगाव व इतर बसस्थानक परिसरात एकट्या वयोवृद्ध प्रवाशांना हेरून दगडापासून रुद्राक्ष बनवतो अशी बतावणी करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरत असल्याची कबुली दिली. त्यांनी माजलगाव बसस्थानकातही असाच गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि दोन मोटारसायकल असा एकूण १,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख आणि पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विग्ने, तसेच अंमलदार महेश जोगदंड, जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, दिलीप गिते आणि गणेश मराडे यांनी पार पाडली आहे.
Comments
Post a Comment