पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन
पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन!
वैयक्तिक व जामीनदाराच्या थकीत कर्जामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पिक कर्ज नाकारल्याचा आरोप; सक्तीची कर्जवसुली थांबविण्याची मागणी — डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि.१५) ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वैयक्तिक कर्जाची थकबाकी तसेच जामीनदाराच्या खात्यावरील थकीत देयकांमुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेकडून पिक कर्जाचे अर्ज पुढील प्रक्रियेसाठी स्वीकारले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
थकीत कर्जाच्या अटींमुळे पिक कर्जाचा मार्ग अडल्याचा आरोप
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेत पिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वैयक्तिक कर्जाची थकबाकी किंवा जामीनदाराच्या खात्यावरील थकीत देयकांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. संबंधित कर्जखाती नियमित करून अद्ययावत केल्यानंतरच पुढील प्रक्रिया करता येईल, अशी भूमिका बँकेकडून घेतली जात असल्याचा आरोपही करण्यात आला.
आधीच दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पेरणी, खते, बियाणे आणि अन्य शेती खर्चासाठी पैशांची गरज आहे. अशा परिस्थितीत पिक कर्जाच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी नमूद केले.
इतर कर्जखात्यांवरील थकबाकीमुळे जामीनदार असलेल्या शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारण्याबाबतच्या अटी शिथिल कराव्यात, तसेच पात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
नेकनूर डीसीसी बँकेतील अडवणूक थांबविण्याची मागणी
सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात शेतकरी आक्रमक
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असताना बँका, मायक्रोफायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालावा आणि नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक योगेश गुप्ता, वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण मुळे, लिंबागणेश शाखेचे व्यवस्थापक सोन्याबापू रासकर, पाटोदा शाखेचे व्यवस्थापक एस. बी. शिंदे, महसूल प्रशासनाच्या मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, ग्राममहसूल अधिकारी गणपत पोतदार तसेच पोलीस प्रशासनातील पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, पोलीस हवालदार नवनाथ मुंडे, तांबे आणि बाला ढाकणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
पिक कर्ज वितरणातील अडचणी दूर करणे, जामीनदार शेतकऱ्यांबाबतच्या अटींमध्ये आवश्यक शिथिलता देणे, नेकनूर डीसीसी बँकेतील कथित अडवणूक थांबविणे आणि सक्तीच्या कर्जवसुलीच्या तक्रारींवर कारवाई करणे, या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रशासन आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा आंदोलनात सहभाग
या रास्ता रोको आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बालासाहेब मोरे पाटील, शेतकरी हक्क मोर्चाचे संयोजक राजेंद्र आमटे, इंटकचे बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, ॲड. गणेश वाणी, विक्रांत वाणी, दामोदर थोरात, अशोकराजे वाणी, शंकर वाणी, पोखरीचे सरपंच बिभीषण मुळीक, पिंपरनईचे सरपंच बालासाहेब वायभट, रेवण मोरे, मुळुकवाडीचे माजी सरपंच कृष्णा पितळे, संतोष भोसले, संजय घोलप, कामगार नेते सुनील भोसले, विवेक बागल आदी सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment