पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे गुरुवारी रास्तारोको
पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे गुरुवारी रास्तारोको!
महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्जदार व जामीनदार शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारले ; जाचक अटी शिथिल करण्याची मागणी — डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि.१३)बीड विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार वैयक्तिक कर्जाची थकबाकी तसेच जामीनदार म्हणून असलेल्या थकीत देयकांचे कारण पुढे करून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेकडून शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे प्रस्ताव स्वीकारले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अटींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक, शारीरिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचा दावा करत संबंधित अटींमध्ये शिथिलता आणावी आणि पिक कर्ज वाटपाची प्रक्रिया जलदगतीने राबवावी, या मागणीसाठी गुरुवार, दि. १५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लिंबागणेश येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून, यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अशी भूमिका मांडली जात असताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बीड विभागीय कार्यालयाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या शेतकरी दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत केवळ जामीनदार असल्यामुळे किंवा संबंधित कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नव्याने पिक कर्ज नाकारले जात असेल, तर या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनावर यांची स्वाक्षरी
या निवेदनावर सरपंच बालासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, दादा गायकवाड, संतोष भोसले, महावीर जाधव, सय्यद अख्तर, उमेश वाणी, रामकिसन गिरे, रामदास वाणी, भालचंद्र गिरे, प्रकाश वायभट, महादेव आवटे, अभिमान वाणी, विक्रांत वाणी, अँड .गणेश वाणी, आशोकराजे वाणी, पांडुरंग वाणी, शिवाजी शिंदे, जय जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामसभेतही पिक कर्जाबाबत ठराव
लिंबागणेश ग्रामपंचायतीच्या दि. ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सहकार्य करावे आणि कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये, या मागणीसंदर्भात ठराव घेण्यात आला. सरपंच बालासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उमेश वाणी यांनी ठराव मांडला, तर रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले.
बीड विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment