दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी देणाऱ्या नाना पाटेकरांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन कट्ट्यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडुन भावपूर्ण श्रद्धांजली

दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी देणाऱ्या नाना पाटेकरांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन कट्ट्यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडुन भावपूर्ण श्रद्धांजली!
बीड : (दि.९)दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जगण्याचे बळ देणारे, जलसंधारणाच्या माध्यमातून नद्यांना पुनरुज्जीवन देणारे ज्येष्ठ अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या निधनाने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत सामाजिक कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी (दि.९) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन कट्ट्यावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला. जलसंधारणाच्या कामांमुळे हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा आधार मिळाला, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच जगण्याची नवी उमेद मिळाली. संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या नानांच्या कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले.

 ११२ किलोमीटर नदी-नाल्यांचे खोलीकरण; १५० गावांना जलसंधारणाचा आधार!

बीड जिल्ह्यात नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे १५० गावांमध्ये नद्या, नाले आणि जलसाठ्यांमधील गाळ काढणे, रुंदीकरण व खोलीकरण अशी कामे राबविण्यात आली. सुमारे ११२ किलोमीटर नदी-नाल्यांचे खोलीकरण व पुनरुज्जीवन करण्यात आल्याने १० हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीला या कामांचा थेट लाभ झाल्याचे सांगण्यात आले.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढवून देणे, शेतीला आधार देणे आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी करण्याच्या दृष्टीने या कामांचे महत्त्व मोठे होते. केवळ मदत वाटपापुरते मर्यादित न राहता, पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न नानांच्या सामाजिक कार्यातून दिसून आला.

 ५०० हून अधिक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात!

शेतकरी आत्महत्यांमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबांचे दुःख जाणून घेत नाम फाऊंडेशनने त्यांना आर्थिक मदत आणि जगण्याचा आधार देण्याचा प्रयत्न केला. २०१५ मध्ये बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात २३० महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतरही मदतीचा हा उपक्रम सुरू ठेवत ५०० हून अधिक कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली.

पतीच्या निधनानंतर संसाराची जबाबदारी एकट्याने पेलणाऱ्या महिलांच्या आयुष्यातील दुःख कमी करणे सोपे नव्हते. त्यांच्या कपाळावरील कुंकू आणि हरवलेले पतीचे छत्र परत आणणे शक्य नसले, तरी त्यांच्या उघड्या पडलेल्या संसाराला सावरण्यासाठी नानांनी मायेचा हात पुढे केला. संकटग्रस्त महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीन आणि पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले. शालेय मुलींना सायकली, दुष्काळग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य आणि दिवाळीच्या काळात किराणा किट देऊन त्यांना दिलासा देण्यात आला.

आर्वी येथील शांतीवन प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथे शांतीवन सामाजिक प्रकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी २०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात आले. शेतकरी कुटुंबांवर कोसळलेल्या संकटाचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, त्यांना सुरक्षित निवास आणि शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला.

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांना परिस्थितीशी लढण्याची ताकद मिळावी, हा या उपक्रमामागील संवेदनशील दृष्टिकोन होता.

सामूहिक विवाह सोहळ्यांतून आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा

दुष्काळ आणि आर्थिक संकटामुळे मुला-मुलींच्या विवाहाचा खर्च पेलणे अनेक शेतकरी कुटुंबांना कठीण होते. ही अडचण ओळखून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्यांत विवाहबद्ध होणाऱ्या वधू-वरांना संसारोपयोगी भांडी, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. आर्थिक अडचणींमुळे विवाहाचा खर्च पेलू न शकणाऱ्या कुटुंबांना यामुळे आधार मिळाला.

 आंदोलन कट्ट्यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन कट्ट्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शेतकरी कुटुंबांचे दुःख समजून घेणारे, दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आणि निराधार कुटुंबांना जगण्याची उमेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नानांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, बाळासाहेब मोरे पाटील, माजी सैनिक अशोक येडे, सय्यद सादेक, रामधन जमाले, राजेंद्र आमटे, हनुमान घोडके, भीमराव कुटे, डॉ. संजय तांदळे, शेलार शिवशर्मा, डॉ लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारे, जलसंधारणातून शेतीला आधार देणारे आणि संकटग्रस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्याची उमेद देणारे नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणी बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात कायम राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी