अखेर वडगाव ढोक जिल्हा परिषदेची विठ्ठल मंदिरात भरणारी शाळा पुन्हा हक्काच्या इमारतीत भरली
अखेर वडगाव ढोक जिल्हा परिषदेची विठ्ठल मंदिरात भरणारी शाळा पुन्हा हक्काच्या इमारतीत भरली!
तहसीलदारांच्या आदेशाने महसूल व पोलिस बंदोबस्तात तारेचे कुंपण हटवुन शाळेचा रस्ता खुला ; पालकांचा सुटकेचा निःश्वास — डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. ०८) गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील जिल्हा परिषद शाळेचा वहिवाटीचा रस्ता दोन शेतकऱ्यांनी तारेचे कुंपण उभारून बंद केल्याने गेल्या चार दिवसांपासून तब्बल १३० विद्यार्थ्यांना गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वर्ग भरवून शिक्षण घ्यावे लागत होते. अखेर तहसील प्रशासनाने दखल घेत तहसीलदारांच्या आदेशाने महसूल व पोलिस बंदोबस्तात तारेचे कुंपण हटवून शाळेचा रस्ता खुला केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग पुन्हा त्यांच्या हक्काच्या शाळेच्या इमारतीत सुरू झाले असून पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
संबंधित प्रकरणी सरपंच आशाबाई ढाकणे व सचिन ढाकणे यांनी तहसील कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा दिला होता. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान आणि शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना लेखी निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने शाळेचा रस्ता खुला करण्याची मागणी केली होती.
दि. ५ रोजी उपविभागीय अधिकारी शुभम पवार व तहसीलदार गितांजली गरड यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना रस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही रस्ता खुला न झाल्याने प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतली.
दि. ७ रोजी दुपारनंतर तहसीलदार गितांजली गरड यांच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात तारेचे कुंपण हटवून शाळेचा रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, पोलिस हवालदार राठोड, राऊत, बारगजे, महिला पोलिस अंमलदार शेळके व निगुळे तसेच महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी जे. एस. लेंडाळ, ग्राममहसूल अधिकारी लक्ष्मण ईटनकर, ग्रामविकास अधिकारी नागरगोजे, सरपंच आशाबाई ढाकणे, सचिन ढाकणे व पालक उपस्थित होते.
तिन दिवस मंदिरात वर्ग
शाळेचा रस्ता बंद झाल्यामुळे १३० विद्यार्थ्यांना तिन दिवस विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वर्ग भरवून शिक्षण घ्यावे लागले. शाळेची इमारत असूनही रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना मंदिराचा आधार घ्यावा लागला.
प्रशासनाच्या पाहणीनंतरही प्रश्न कायम
दि. ५ रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी घटनास्थळी पाहणी करून रस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही रस्ता खुला न झाल्याने पालकांमध्ये नाराजी होती.
निवेदन अन् पाठपुराव्यानंतर अखेर कारवाई
तहसील कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा, जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले लेखी निवेदन आणि प्रसारमाध्यमांनी प्रश्न लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात रस्ता खुला केला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असून भविष्यात शाळेच्या मूलभूत सुविधांवर अशा प्रकारे अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली.
Comments
Post a Comment