लिंबागणेश येथे दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात महसूल, कृषी व ग्रामविकास यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर
लिंबागणेश येथे दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात
महसूल, कृषी व ग्रामविकास यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर; वस्तुनिष्ठ नोंदीवर प्रशासनाचा भर
बीड प्रतिनिधी : (दि.०३)दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या कामाला वेग आला असून, महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशाने तालुक्यात गावनिहाय पथके तैनात करण्यात आली आहेत.
सुधारित पंचनामा आदेशानुसार गावनिहाय पथकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक गावासाठी ग्राममहसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असलेली ग्रामस्तरीय यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. संबंधित पोलिस पाटील, महसूल सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
पंचनाम्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी (महसूल), मंडळ अधिकारी (कृषी) तसेच पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती नोंदवावी, यावर प्रशासनाने भर दिला आहे.
दरम्यान, बीड तालुक्यातील पंचनाम्यांच्या कामाला गती देण्यासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्याच अनुषंगाने आज शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी लिंबागणेश येथील शेतकऱ्यांच्या शेतावर महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळी पंचनामे केले.
यावेळी ग्राममहसूल अधिकारी गणपत पोतदार, सहाय्यक कृषी अधिकारी संतोष काशिद, ग्रामविकास अधिकारी दत्ता नागरे, यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे,सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, शेतकरी लक्ष्मण वाणी, वसिम शेख, विक्की जाधव सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
पंचनाम्याचे सोपस्कार पाडण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई द्यावी :- डॉ.गणेश ढवळे
सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. शेतात पाहण्यासाठी काही शिल्लक नसल्याने सरकारने महसूल व कृषी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या पंचनाम्याचे सोपस्कार पार न पाडता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment