जिल्हा रुग्णालयासमोरील दुभाजक तोडून आपत्कालीन रस्ता खुला करा

जिल्हा रुग्णालयासमोरील दुभाजक तोडून आपत्कालीन रस्ता खुला करा!

गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळ कशासाठी? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनावर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल


 

बीड : (दि.०२) बीड जिल्हा रुग्णालयात केवळ बीड शहरातूनच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातून अपघातग्रस्त, हृदयविकाराचा झटका आलेले, विषप्राशन केलेले तसेच अन्य गंभीर अवस्थेतील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. अशा रुग्णांना रुग्णालयात पोहोचविताना प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. मात्र, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सलग दुभाजक उभारून थेट प्रवेशाचा मार्ग बंद करण्यात आल्याने आपत्कालीन रुग्णवाहिकांना एक ते दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने रूग्णांच्या जिविताशी खेळ मांडला असुन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे यांनी केला.

आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा विचार न करता रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे का? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल उपस्थित करत डॉ. ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील दुभाजकाजवळ निदर्शने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.

 रुग्णवाहिकांना अतिरिक्त वळसा; गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका

यापूर्वी बार्शी रोड तसेच राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या रुग्णवाहिकांना थेट वळसा घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात दाखल होता येत होते. मात्र, दुभाजक उभारल्यानंतर हा थेट मार्ग बंद झाला आहे. परिणामी, रुग्णवाहिकांना पर्यायी मार्गाने एक ते दोन किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः वाहतूक कोंडीच्या काळात या अतिरिक्त वळशामुळे रुग्णालयात पोहोचण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. हृदयविकाराचा झटका, गंभीर अपघात, विषप्राशन अथवा अन्य जीवघेण्या परिस्थितीत पाच-दहा मिनिटांचा विलंबदेखील उपचार प्रक्रियेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासमोरील दुभाजकात तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका अथवा पूर्वीप्रमाणे थेट प्रवेशाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

‘वाहतूक नियोजन करताना रुग्णालयाचा विचार का नाही?’

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुभाजक उभारणे आवश्यक असल्यास त्यासोबत जिल्हा रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी आपत्कालीन प्रवेशमार्गाची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रस्ता बंद करण्यापूर्वी स्थानिक वाहतूक व्यवस्था, रुग्णवाहिकांची हालचाल आणि आपत्कालीन आरोग्यसेवेची गरज यांचा अभ्यास करण्यात आला होता का, असा प्रश्न डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला.

जिल्हा रुग्णालयासमोरील दुभाजकात तातडीने रुग्णवाहिकांसाठी मार्ग खुला करावा, अन्यथा प्रशासनाच्या निष्काळजी नियोजनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, रामनाथ खोड, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, इंटक बीडचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोडके, राष्ट्रीय किसान मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव कुटे, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.संजय तांदळे, नितीन जायभाये (अध्यक्ष बीड शहर बचाव मंच)प्राचार्य डॉ. डी. जी. तांदळे ( मार्गदर्शक बीड शहर बचाव मंच), अँड . सुरेंद्र देशमुख, दत्तात्रय सौंदरमल,पांडुरंग हराळे,आदी सहभागी झाले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी