स्वखर्चाने १८ लाख रुपये खर्चून शाळा उभारणाऱ्या वनमाला कवडे यांचा सत्कार

आदर्श शिक्षिका वनमाला कवडे लिंबागणेश केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका 

 स्वखर्चाने १८ लाख रुपये खर्चून शाळा उभारणाऱ्या वनमाला कवडे यांचा सत्कार; शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. लेनाजी गायकवाड , उपाध्यक्षपदी सय्यद अख्तर 
लिंबागणेश (दि.०१) :स्वखर्चाने जिल्हा परिषद शाळेसाठी तीन वर्गखोल्या व संरक्षक भिंत उभारून शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्रीमती वनमाला कवडे यांची लिंबागणेश येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीनिमित्त शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. लेनाजी गायकवाड, तर उपाध्यक्षपदी सय्यद अख्तर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच बाळकृष्ण थोरात, पत्रकार हरिओम क्षीरसागर,उद्योगपती भागवत बावणे, माऊली जगदाळे, बाबुराव बावणे यांची उपस्थिती होती. यावेळी वनमाला कवडे, प्रा. लेनाजी गायकवाड व सय्यद अख्तर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दिपक घाटे , प्रास्ताविक डॉ.गणेश ढवळे यांनी तर आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड यांनी केले.

मुख्याध्यापिका वनमाला कवडे यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 स्वखर्चाने १८ लाखांची शाळा उभारली

वनमाला कवडे यांनी आपल्या सेवाकाळाची सुरुवात नवगण राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत केली. त्यानंतर त्यांची गोलंग्री येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली. तेथील शाळेची दुरवस्था पाहून त्यांनी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत स्वखर्चाने तब्बल १८ लाख रुपये खर्च करून तीन वर्गखोल्या व संरक्षक भिंत उभारली.

त्यांच्या या कार्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

 शाळेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. लेनाजी गायकवाड व उपाध्यक्षपदी सय्यद अख्तर यांची निवड झाल्याने शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच कला, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक, पालक, समिती व ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास शिक्षक दिपक घाटे, श्री . कावळे, सहशिक्षिका अयाचित ,गिते, सानप , शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी नितीन जाधव , योगेश शिंदे, रमेश गायकवाड पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार समारंभ पार पडला.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी