महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून गेलाय दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करा
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून गेलाय दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करा
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरून बाजीराव ढाकणे यांचा सरकारला सवाल; कर्नाटकच्या धर्तीवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी
बीड प्रतिनिधी : - राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात आली असून ग्रामीण भागात पाणी, चारा आणि शेतीच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा महा एनजीओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. पावसाचा खंड, पिकांची अवस्था, उपलब्ध पाणीसाठा, चारा व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती यांचा तातडीने आढावा घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करत मदत व उपाययोजनांना सुरुवात केल्याचा दाखला देत बाजीराव ढाकणे यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
‘महाराष्ट्र भारतात नाही. की, कर्नाटक विदेशात आहे ?’
“शेजारील कर्नाटक राज्य दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन उपाययोजना सुरू करू शकते, तर महाराष्ट्रात निर्णयासाठी आणखी प्रतीक्षा का? शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपताना केवळ प्रशासकीय प्रक्रियेकडे पाहून चालणार नाही,” असे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले.
खासदार, आमदारांनी आवाज उठवावा
महाराष्ट्रातील खासदार व आमदारांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी राज्य व केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणीही बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.
“आमच्या महाराष्ट्रातील खासदार-आमदार नेमके कोणत्या मोहिमेवर आहेत, हे आम्हाला कळेल का?
शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सरकारकडे तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी दबाव निर्माण करावा,” असे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.
तातडीच्या उपाययोजनांची मागणी
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या व चारा उपलब्ध करून द्यावा तसेच पीककर्जाबाबत दिलासा देण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी ढाकणे यांनी केली.
“दुष्काळाचा निर्णय कागदोपत्री प्रक्रियेपुरता मर्यादित न ठेवता जमिनीवरील परिस्थिती लक्षात घेऊन झाला पाहिजे. सरकारने आणखी विलंब न करता दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करून शेतकरी व ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा,” अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली.
Comments
Post a Comment