महसूल व पोलीस प्रशासनाच्या पाठबळावर पवनचक्की कंपन्यांची ‘रझाकारी’ सुरू

महसूल व पोलीस प्रशासनाच्या पाठबळावर पवनचक्की कंपन्यांची ‘रझाकारी’ सुरू!
शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप; सौंदाना प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे
पाटोदा : (दि. ३०) पवन व सौर ऊर्जा कंपन्यांना शेतजमिनींचा ताबा मिळवून देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यास पोलिसी दबाव, धमक्या व गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पाटोदा तालुक्यातील सौंदाना शिवारातील पवनचक्की प्रकल्पावरून शेतकरी आणि जेएसडब्ल्यू एनर्जी पॉवर कंपनी यांच्यातील वादाला मंगळवारी (दि. २९) गंभीर वळण लागले. कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी जड साहित्य व इतर मटेरियलची वाहतूक सुरू असताना शेतकऱ्यांनी मोबदला व आपल्या हक्कांबाबत प्रश्न उपस्थित केल्याने तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर दादासाहेब सुंदर कदम आणि प्रदीप भालचंद्र कदम या दोन शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 ग्रामपंचायतीच्या ना-हरकत प्रमाणपत्राचा मुद्दा

सौंदाना शिवारातील या प्रकल्पासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही, तसेच बाधित शेतकऱ्यांनी कोणत्याही सहमतीपत्रावर स्वाक्षऱ्या केलेल्या नसल्याचा दावा डॉ. ढवळे यांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर अथवा वाहतुकीचा मार्ग निश्चित करताना संबंधितांची संमती, कायदेशीर प्रक्रिया आणि योग्य मोबदला याबाबत प्रशासनाने स्पष्टता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 बेडूकवाडी-जवळाला प्रकरणांचाही संदर्भ

पाटोदा तालुक्यातील दासखेड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बेडूकवाडी व जवळाला परिसरात यापूर्वीही पवनचक्की कंपन्यांच्या प्रकल्पांवरून शेतकरी आणि प्रशासनामध्ये वाद निर्माण झाल्याचा दावा डॉ. ढवळे यांनी केला. मोबदल्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसी दबाव आणला जात असल्याचे प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 “महसूल व पोलिस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे”

पवनचक्की प्रकल्पांना विरोध करणाऱ्या किंवा मोबदल्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करणे, धमकावणे, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळा मोबदला देणे अथवा धनादेश न देणे असे प्रकार होत असल्याचा आरोप डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. कंपन्यांना प्रकल्प उभारणीसाठी कायदेशीर संरक्षण देताना शेतकऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

सौंदाना येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याच्या आरोपांची चौकशी करावी, तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या, शेतकऱ्यांची संमती आणि मोबदल्याची प्रक्रिया प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी