बीड जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन ह्युमिडीफायरमधील गढूळ पाणी प्रकरणी चौकशीचे आदेश
बीड जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन ह्युमिडीफायरमधील गढूळ पाणी प्रकरणी चौकशीचे आदेश
उपसंचालकांकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे निर्देश
“डॉ. संतोषकुमार सोळंके ठोस कारवाई करणार की दोषींची पाठराखण?” — डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.२३) बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारादरम्यानच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कक्षात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी नेत असताना श्वास घेण्यास त्रास झाल्याने ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. यावेळी रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या ह्युमिडीफायरमधील पाणी अत्यंत गढूळ, रंग बदललेले व गाळयुक्त असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ह्युमिडीफायरमध्ये दूषित किंवा गढूळ पाणी वापरले जात असल्यास त्यातून सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असून, निर्माण होणाऱ्या सूक्ष्म थेंबांमुळे श्वसनमार्गाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः आयसीयूतील गंभीर आजारी किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी ही बाब अधिक गंभीर ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांकडे केली होती.
उपसंचालकांकडून चौकशीचे आदेश
या तक्रारीची दखल घेत डॉ. रेखा गायकवाड, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, लातूर यांनी डॉ. संतोषकुमार सोळंके, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड यांना सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीचा अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आणि संपूर्ण दस्तऐवजांसह कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाची माहिती आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक, रा.आ.अ. मुंबई, संचालक (रुग्णालये), आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, सहसंचालक (अ.व.प्र.), आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई तसेच जिल्हाधिकारी बीड यांनाही देण्यात आली आहे.
जुन्या प्रकरणांवरूनही कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
“बीड जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार संपण्याचे नाव घेत नाही. प्रसूतीदरम्यान छाया पांचाळ व शेख मुस्कान यांच्या मृत्यूच्या प्रकरणांसह संध्या गायकवाड यांच्या सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य शरीरात राहिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होऊन गर्भाशय काढण्याची वेळ आल्याने त्यांचे कायमस्वरूपी मातृत्व हिरावले गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्येही पीडितांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने व आंदोलने करून कारवाईची मागणी केली आहे,” असे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे.
“या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन ह्युमिडीफायरमधील गढूळ पाण्याच्या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोषकुमार सोळंके निष्पक्ष व ठोस कारवाई करतात की चौकशी केवळ कागदोपत्रीच राहते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment