‘कल्पतरु’च्या उपक्रमामुळे बीडमधील गणेश मंडळांना बळ : पंकजाताई मुंडे

‘कल्पतरु’च्या उपक्रमामुळे बीडमधील गणेश मंडळांना बळ : पंकजाताई मुंडे

‘कल्पतरु प्रतिष्ठान’च्या उत्कृष्ट देखावा स्पर्धेतील विजेत्यांना मुंडे भगिनींच्या हस्ते बक्षीस वितरण
बीड (प्रतिनिधी)
दि.२७ : गणेशोत्सवातील उत्कृष्ट देखाव्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारा प्रबोधनात्मक संदेश दिला जातो. अशा स्पर्धांमुळे स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळून गणेश मंडळांना नवी ऊर्जा व प्रोत्साहन मिळते. ‘कल्पतरु प्रतिष्ठान’च्या अशा अभिनव उपक्रमांमुळे बीडमधील गणेश मंडळांना मोठे बळ मिळाले, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत ‘कल्पतरु प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून गणेशोत्सवानिमित्त आयोजित इनोव्हेशन चॅलेंज-उत्कृष्ट देखावा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बीडमध्ये रविवारी (दि.२७) सौ.के.एस.के. महाविद्यालयातील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर क्रीडा संकुल व सांस्कृतिक सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना.पंकजाताई मुंडे बोलत होत्या.

व्यासपीठावर माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, अक्षय मुंदडा, डॉ.योगेश क्षीरसागर, भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर, युवा नेते आदित्य सारडा, डॉ.ज्योती घुंबरे, जयश्री मुंडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे यांच्यासह परीक्षक समितीचे प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, प्रा.सारंग वाघमारे, फामजी पारीख, विद्याभूषण बेदरकर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, क्षीरसागर कुटुंबीयांचा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. मी स्वतः परळीत अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करत आले आहे; त्यामुळे अशा उपक्रमांतून स्थानिक पातळीवरील युवकांना व मंडळांना मिळणाऱ्या प्रेरणेचे महत्त्व मला ठाऊक आहे. बीडकरांनी या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पांडुरंग सुतार यांनी केले. तर आभार प्रा.अनिता शिंदे यांनी मानले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बीडचे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लोक यावेत : डॉ. प्रितमताई मुंडे

गेल्या १०-१२ वर्षांच्या अनुभवातून मला जाणीव आहे की, वर्गणी जमा करण्यापासून ते भव्य देखावा उभारण्यापर्यंत मंडळांचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेतात. आपले मंडळ इतरांपेक्षा दर्जेदार कसे ठरेल, हाच त्यांचा ध्यास असतो. या कष्टाला दाद देण्यासाठी ‘कल्पतरु’सारखे व्यासपीठ अत्यंत गरजेचे आहे. बीडमधील देखावे इतके भव्य व सामाजिक संदेश देणारे व्हावेत की ते पाहण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून लोकांनी बीडमध्ये यावे, अशा सदिच्छा माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.


‘कल्पतरु’कडून सातत्याने लोकोपयोगी उपक्रम : डॉ.योगेश क्षीरसागर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या या स्पर्धेत सहभागी ३० पैकी २१ गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्यांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. भविष्यातही ही स्पर्धा अविरत सुरू राहील, अशी ग्वाही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली. तसेच, आगामी काळात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना थेट दिलासा देणारे उपक्रम राबवले जातील, असेही ते म्हणाले. बीडच्या रेल्वे स्वप्नपूर्तीत स्व.गोपीनाथराव मुंडे आणि स्व.केशरकाकू क्षीरसागर यांचे मोठे योगदान असून, पंतप्रधान मोदी व पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच रेल्वे प्रत्यक्षात धावली, असे त्यांनी नमूद केले.


दोन मंडळांकडून पारितोषिकाची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी परत

पारितोषिक वितरण सोहळ्यात दोन गणेश मंडळांनी आदर्श सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावणाऱ्या दत्तात्रय गणेश मंडळाने २१ हजार रुपये, तर महाराणा प्रताप गणेश मंडळाने ३१ हजार रुपयांची बक्षीस रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘कल्पतरु’कडे परत सुपूर्द केली. या दोन्ही मंडळांच्या संवेदनशीलतेचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


‘या’ गणेश मंडळांचा सन्मान; लाखोंची मिळाली पारितोषिके

बीडमध्ये आदियोगी देखावा साकारणाऱ्या न्यू गणेश मंडळाला १ लाख रुपये प्रथम पारितोषिक मिळाले. गंगावतरण देखावा साकारणाऱ्या नवरंग गणेश मंडळास द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये, सीता स्वयंवर देखावा साकारणाऱ्या राष्ट्रीय गणेश मंडळ आस ५१ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच, उत्तेजनार्थ गणेश मंडळांमध्ये महाराणा प्रताप गणेश मंडळास ३१ हजार, दत्तात्रय गणेश मंडळास २१ हजार, मोरया गणेश मंडळास १५ हजार, तसेच जय मल्हार गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ, सावता गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ, राजे संभाजी मंडळ, राजमुद्रा गणेश मंडळ, न्यू समर्थ गणेश मंडळ, चंपावती माध्यमिक विद्यालय बीड, माऊली गणेश मंडळ, पुरणदास गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ, महाराष्ट्रीयन गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ, नवगण गणेश मंडळ, जय श्रीराम गणेश मंडळ या गणेश मंडळांना प्रत्येकी ११ हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी