आयडेंटिटी कार्ड कागदावरच; पंचायत समितीत प्रत्यक्षात गायब
आयडेंटिटी कार्ड कागदावरच; पंचायत समितीत प्रत्यक्षात गायब!
लेखी उत्तरात सर्वांच्या गळ्यात ओळखपत्र, पण कार्यालयात प्रत्यक्ष चित्र वेगळेच; नागरिकांचा संताप
आष्टी प्रतिनिधी |
पंचायत समिती आष्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गळ्यात आयडेंटिटी कार्ड परिधान करावे, याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यावर गटविकास अधिकारी प्रयाग धमाल यांनी लेखी उत्तर देत “सर्व अधिकारी/कर्मचारी दैनंदिन ओळखपत्राचा वापर करीत आहेत”, असे स्पष्ट केले आहे.
मात्र प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यानंतर अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लेखी उत्तर आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकारी कोण, हे शोधण्यासाठी नागरिकांची धावपळ!
शासकीय कामासाठी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कोण आहे, हे ओळखण्यासाठी वारंवार चौकशी करावी लागते. खुर्चीवर नेमका संबंधित अधिकारी बसला आहे की दुसरे कोणी, याचा ताळमेळ लागत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
“लेखी उत्तरात आयडेंटिटी कार्ड, मग प्रत्यक्षात गळ्यात कुठे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
प्रशासनाने केवळ कागदोपत्री उत्तर न देता प्रत्यक्ष कार्यालयीन पाहणी करून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वापरणे बंधनकारक आहे की नाही आणि त्याची अंमलबजावणी होते का, याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी होत आहे.
कागदावर नियम आणि प्रत्यक्षात बेफिकिरी असेल, तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Comments
Post a Comment